पंढरपूर, 8 ऑक्टोबर: ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न देणारे भाजप नेते कल्याण काळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्याला दिल्याचं समोर आलं आहे. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्यानं उपमुख्यमंत्री अजित दादांना फोन केला होता. या संभाषणाची 'ऑडिओ क्लिप' आता व्हायरल झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा...महाराष्ट्र अडचणीत! आर्थिक परिस्थिती बिकट, अर्थमंत्रालयानं व्यक्त केली मोठी चिंता
अजितदादांच्या या सल्ल्यानंतर शरद पवारांच्या पंढरपूर दौऱ्यात कारखान्याच्या प्रश्नासाठी मागे पुढे फिरणाऱ्या कल्याण काळेंच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतकऱ्याला स्वतः चे नाव सांगून गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्यानंतर शेतकऱ्याला हत्तीचं बळ प्राप्त झालं, असल्याचं बोललं जात आहे.
भाजप नेते कल्याण काळे यांचे पंढरपूर तालुक्यात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना आणि सीताराम महाराज खर्डी येथे खासगी असे दोन साखर कारखाने आहेत. सन 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षांची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. तर 2019-20 या गाळप हंगामात दोन्ही कारखाने बंद होते. दोन वर्षे एफआरपीची रक्कम थकीत आहे तर चालू हंगामात कारखाने सुरु होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे याबाबत तक्रार केली. यावर अजितदादांनी थेट कल्याण काळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. यावर चव्हाण यांनी शेतकऱ्यांची कोण दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त केली. यावर अजित दादा म्हणाले, 'पोलिसांना माझं नाव सांगा'.
हेही वाचा..महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना 'क्लीन चिट'
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, खासदार शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या घरी आले असता कल्याण काळे यांना भेट दिली नव्हती. यावरून कल्याण काळे नाराज झालं होते. यावर आमदार भालके यांनी प्रसिद्धी पत्रक काढून कल्याण काळे भाजपत असले तरी विठ्ठल परिवाराचे प्रमुख नेते आहेत. आम्ही विठ्ठल परिवार म्हणून एकत्र असल्याचा खुलासा केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.