मुंबई, 20 जुलै : सत्ता गेल्यानंतर सर्व अधिकार जातात तसेच शासकीय घर सुद्धा सोडावं लागत. पण महाराष्ट्राचे विरोध पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना देवगिरी (Devgiri Bungalow) सोडायचे नाही. यासाठी अजित पवार यांची सत्ताधाऱ्यांकडे पायपीट सुरू आहे. गेली अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पदावर काम करत असताना अजित पवार यांना देवगिरी बंगला मिळाला होता. तर आता मात्र अजित पवार यांना देवगिरी आपलासा वाटायला लागला आहे. अजित पवार यांनी देवगिरी बंगला स्वतः कडे राहावा, यासाठी उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन केला असल्याचंही बोललं गेलं, पण हे वृत्त राष्ट्रवादीकडून फेटाळून लावण्यात आलं. अजित पवार यांनी सामान्य प्रशासन विभागाला देवगिरी बंगला आपल्याकडे राहावा, या मागणीचं पत्र दिलं आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांना बंगले वाटपाचं काम करतं. अजित पवार 1999 ला काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आलं तेव्हापासून देवगिरी बंगल्यावर राहायला गेले. 1999 ते 2014 अजित पवार देवगिरी बंगल्यावरच राहत होते. पण 2014 साली भाजपचं सरकार आल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना देवगिरी बंगला मिळाला. 2019 ला पुन्हा एकदा सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार देवगिरी बंगल्यावर राहायला गेले. देवेंद्र फडणवीस 2019 साली विरोधी पक्षनेता झाल्यानंतर त्यांना सागर बंगला देण्यात आला. हा बंगला आधी मंत्र्यांसाठी आरक्षित होता, पण फडणवीस यांनी सागर बंगल्याची (Sagar Bungalow) मागणी केली. महाविकासआघाडी सरकारनेही कोणताही आक्षेप न घेता फडणवीसांना सागर बंगला दिला. आता अजित पवारांनी देवगिरी बंगल्यातच राहण्याचा आग्रह केला आहे, त्यामुळे फडणवीस मागची परतफेड करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.