मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड, 27 जानेवारी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेचा शपथविधीमागे पवारांची खेळी असू शकते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर आता खुद्द विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी अजित पवार नांदेड येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
मी आधीच माध्यमांना स्पष्ट केलंय : अजित पवार
पहाटेचा शपथविधी हा शरद पवारांची खेळी होती अश्या चर्चा सुरू आहेत. पण, या चर्चा महागाई, बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्यासाठी सर्वांचे लक्ष विचलित करण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्या संपूर्ण प्रकरणानंतर मी माध्यमांना त्या विषयाबद्दल कधीच बोलणार नाही हे तेव्हाच स्पष्ट केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. बराच काळ झाला. आता त्या विषयाला महत्व नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
देशभरात चर्चा
23 नोव्हेंबर 2019 ला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. हे सरकार फारकाळ टिकू शकले नाही. मात्र, त्यांच्या या पहाटेच्या शपथविधीची देशभरात चर्चा झाली. अजूनही विरोधकांकडून या घटनेचा उल्लेख केला जातो.
वाचा - 'तर मी आणि दादाने हॉटेल किंवा मॅट्रीमोनीची साईट उघडली असती..' : सुप्रिया सुळे
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले, मला वाटत नाही की अजित पवार भुलले असतील. त्यावेळी राष्ट्रपती राजवट होती. राष्ट्रपती राजवट उठवण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. त्या अनुषंगाने केलेली एखादी खेळी असू शकते. अजित पवारांनी त्यावेळी जी विधाने केली त्याला फार महत्त्व आहे, असे मला वाटत नाही.
शिवसेनेला साथ दिली
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री बनून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात काम केले. स्पष्टपणे कारभार केला. राष्ट्रवादी फुटली नाही. शिवसेनेचेच आमदार आमदार गेले म्हणून सरकार कोसळले. राष्ट्रवादीने शिवसेनेला शेवटपर्यंत ठामपणे साथ दिली हे आपल्याला नाकारता येणार नाही. प्रसारमाध्यमाशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
काय झाले होते 2019 मध्ये?
2019 साली महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरु होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. गडबड होऊ नये यासाठी दक्षता घेत भल्या पहाटे राजभवानावर जाऊन या दोघांनी शपथ घेतली. परंतु हे सरकार अल्पायुषी ठरले.
पाटलांची सारवासारव
दरम्यान जयंत पाटील यांनी याप्रकरणी खुलासा केला आहे. ते म्हणाले, शरद पवार यांची खेळी असे मी बोललो नाही. याचा मी कयास बांधला होता. जो घटनाक्रम बघितला होता आणि त्या घटनाक्रमाचा फायदा हे राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी होता. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणून बुजून केले असे म्हणता येत नाही असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, Devendra Fadnavis