बारामती 16 जुलै : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार बारामती दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर ते तालुक्यातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी गेले आहेत. तालुक्यात विविध विकास कामांबरोबर त्यांनी कार्यक्रमांनाही हजेरी लावली. बारामती तालुक्यात भगिनी मंडळ व वन विभागाच्यावतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 1 हजार झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने भाषण करत कार्यक्रमाला रंगत आणली. (Ajit pawar Baramati)
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नि सुनेत्रा पवार, भावजय शर्मिला पवार यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी अजित पवार म्हणाले कि, बारामतीला दर आठवड्याला येण्याचा प्रयत्न असतो परंतु यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. यामुळे तालुक्यात येणंजाण कमी असायचं परंतु ध्यानीमनी नसताना मुख्यमत्र्यांना राजीनामा द्यावा लागल्याने माझ्यावर आता विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे.
हे ही वाचा : BREAKING : अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला, 10 जणच घेणार शपथ, नावं गुलदस्त्यात?
सत्ता असो वा नसो तालुक्याचा विकास याकडे मी पूर्णपणे लक्ष देणार आहे. बारामतीत सोयीसुवीधा आहेत यापेक्षाही चांगल्या सुविधा मिळण्यासाठी मी काय प्रयत्न करत राहणार आहे. इतक्या वर्षात भगिनी मंडळाने मला कधी कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलवलंच नाही. मध्यंतरी महिला मंडळाच्या पदाधिकारी भेटल्या त्या म्हणाल्या तुम्ही कार्यक्रमाला येतच नाही मी म्हणालो बोलवतच नाही मी रिकामाच असतो असे म्हणत अजित पवार यांनी महिलांना कोणतेही काम असुद्या करून देण्याचा शब्द दिला.
बारामतीत कोणतही काम करताना कोणीतरी पवार असावंच लागतं..! शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनी कितीही काम केलं तरी त्याला बारामतीकरांची साथ लाभल्याशिवाय मूर्त स्वरुप येत नाही. माझे पीए सारखं लवकर उरका म्हणत होते. पण मी भगिनी मंडळाचा कार्यक्रम असल्यानं चालू द्या म्हणालो. भगिनी मंडळाकडून देशी झाडं लावली जात आहेत त्यातून चांगला फायदा होईल. झाड लावल्यानंतर ते जगलंय का? त्याची वाढ होतेय का? याकडेही लक्ष द्या असे अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा : भविष्यात कांद्याचा वांदा होऊ नये म्हणून केंद्राची आतापासूनच तयारी काय आहे पूर्ण योजना?
दरम्यान पदाधिकाऱ्यांनी विविध भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्याच्याही पवारांनी सूचना केल्या. ते पुढे म्हणाले कि, पूर्वी बारामतीमध्ये बऱ्याच भागात माळरान होतं पण आता सर्व बदलतं आहे, त्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचं आहे. पावसाळ्यात वृक्षारोपणावर भर द्या. देशी झाडे लावण्यावर भर द्या. उद्याच्या काळात हरीत बारामती बनेल यासाठी प्रयत्न आपण करणे गरजेचं असल्याचे पवार म्हणाले.