सुनिल दवंगे, प्रतिनीधी
शिर्डी, 13 जुलै : "राज्यात सत्तांतर झालेलं लोकांना आवडलेलं नाही, त्यामुळे आगामी काळात लवकरच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल", असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरमरीत टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांनी युतीत निवडणूक लढवली होती. त्यावेळी विश्वासघात केला गेला. खरंतर शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावं, असं विखे पाटील यांनी शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर म्हटलं. तसेच काँग्रेसला सत्तेत असताना नगण्य स्थान होतं, अशी टीका विखे पाटलांनी केली.
"महाराष्ट्राला लोकांचं सरकार मिळालं असून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अडीच वर्षात समाजातील कोणताच घटक समाधानी नव्हता. कारण महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघातानं आलेलं सरकार होतं. मात्र पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार संभाळत आहेत. जनतेच्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करेल, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गुरुपौर्णिमा निमित्तानं साईबाबांनी शक्ती द्यावी", अशी प्रार्थना केल्याच विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं.
शिवसेनेला उशिरा सुचलेलं शहाणपण
"राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मु्र्म यांना शिवसेनेनं पाठींबा जाहीर केला आहे. हे स्वागतार्हच असून शिवसेनेला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हा पाठींबा कोणत्या मजबूरीनं दिला हे माहीत नाही, मात्र बहुतांश खासदारांची मागणी होती तेव्हा लोकप्रतिनीधी किंवा खासदारांच ऐकावं लागतं. आणि हे आता शिवसेनेच्या नेतृत्वाला समजायला लागलं आहे", असं म्हणत आमदार विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
(वर्षभराने पुन्हा राज्यावर झिकाचं संकट; 7 वर्षांच्या चिमुकलीला व्हायरसची लागण)
पवारांनी आत्मपरीक्षण करावं
शरद पवार यांनी राज्यातील सत्ता परिवर्तन लोकांना आवडलेलं नाही, त्यामुळे आगामी काळात लवकरच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल, असा दावा केलाय. यावर बोलताना विखे पाटील यांनी शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं, अशी टीका केली आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युतीत निवडणूक लढवली. त्यात 160 पेक्षा आधिक जागा जिंकल्या, असा दावा करत महाविकास आघाडी सरकार स्थापन करुन विश्वासघात कोणी केला याच आत्मचिंतन त्यांनी स्वतः करावं, अशी टीका विखे पाटील यांनी यावेळी केली.
सत्तेत असताना विचारलं नाही मग आता काय?
"औरंगाबाद नामकरण आणि द्रौपदी मुर्म यांना पाठिंबा देताना उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला विचारलं नसल्याचं काल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. यावर बोलतांना विखे पाटील यांनी थोरातांवर टीका करत सत्तेत असताना तुम्हाला कधी घटर पक्षांनी विचारलं नाही. त्यावेळी कॉंग्रेस मंत्र्यांना नगण्य स्थान होतं. याचंच दुःख आणि शल्स कॉंग्रेस मंत्र्यांना आहे जे त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. अर्थप्राप्तीसाठी कॉंग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते", असा टोला विखे पाटील यांनी थोरातांना नाव न घेता लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.