पुणे, 27 जानेवारी : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात थंडीने घातलेले थैमान कमी होत चालले आहे. अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे ज्या भागात पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात आकाश ढगाळ होत आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात 24 जानेवारीपासून ढगाळ वातावरण होण्यास सुरूवात झाली आहे. अचानक बदलेल्या वातावरणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद, नगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. आज (ता. 27) राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हे ही वाचा : जानेवारीचा शेवट पावसात जाणार, महाराष्ट्रासह अनेक राज्यात पावसाची शक्यता, imd चा इशारा
नगर जिल्ह्यातील सोनई, नेवासा, वांबोरी, राहुरी, कर्जत येथे पावसाच्या सरी पडल्या. लोहगाव (ता. नेवासा) तुरळक गारपीट झाली. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील दूधड, शेंदूरवादा, गोदावरी नदी काठच्या कायगाव (ता. गंगापूर) परिसरात, तसेच लिंबेजळगाव, लोहगाव व परिसरात पाऊस झाला, औरंगाबाद शहरात मेघगर्जनेसह तर ढोरकीन, बालानगर परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
दरम्यान मागच्या 24 तासांत पुणे 30.8 (13.8), जळगाव 28.7 (16.4), धुळे 27 (10.2), कोल्हापूर 29.5 (18.8), महाबळेश्वर 23.6 (14.9), नाशिक 27.5 (12.6), सांगली 30 (19.4), सातारा 31.3 (18.2), सोलापूर 32.6 (20.9), रत्नागिरी 27 .6 (19.8), औरंगाबाद 29.4 (13.2), नांदेड 32.6 (18.8), अकोला 32.5 (18.1), अमरावती 31 (16.9), बुलडाणा 30.2 (16.3), चंद्रपूर 29.2 (16.8), गडचिरोली 30.2 (14.6 ), गोंदिया 30.8 (17), नागपूर 31 (16.3), वर्धा 31.1 (17), यवतमाळ 31.5 (16.5) तापमानाची नोंद झाली.
दरम्यान पुणे जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत आहे. या ढगाळ हवामानाचा विविध पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. त्यातच जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यास नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. गेल्या दोन, तीन महिन्यांपूर्वी जिल्ह्यांत विविध ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली असून फळबागांचे मोठे नुकसान झाले.
हे ही वाचा : Beed : सरकारी कामांमुळे नशीब पालटलं, शेतकरी होतोय मालामाल! पाहा Video
या नुकसानीचे नुकतेच पंचनामे झाले असले तरी मदत अद्यापही मिळालेली नाही. सध्या ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पिकाची वाढ पाण्याअभावी खुंटली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. गहू, कांदा पिकांना फटका बसत आहे. गहू पिकांवरही रोगांनी आक्रमण केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar News, Aurangabad News, Mumbai, Pune rain, Rain fall, Weather, Weather Update