बीड, 22 जानेवारी : राज्यातील दुष्काळी जिल्ह्यामध्ये बीडचा समावेश आहे. या जिल्ह्यातील अनेक शेतकरी हे अल्पभूधारक असून जिरायती शेती करतात. त्यामुळे साहजिकच त्यांच्या उत्पन्नाला मर्यादा आहेत. गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या सरकारी कामांचा फायदा या शेतकऱ्यांना होतोय. या कामांमुळे शेतकऱ्यांचे नशीब बदलले असून ते मालामाल झाले आहेत.
काय घडला बदल?
बीड जिल्ह्यातील जिरायती शेतीचे दर कमी अधिक आहेत. मात्र, बागायती शेतीचा एकरी दर लाखांपासून कोटींच्या घरात पोहोचला आहे. त्यातच हायवे रोड शेजारील जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. मागील तीन चार वर्षांपासून जमिनीच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत.
बीड जिल्ह्यातून अनेक राज्य महामार्ग गेले आहेत. त्यामुळे परिसरातील असणाऱ्या जमिनींना देखील मोठी मागणी वाढली असून दर देखील प्रचंड वाढले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यातील जमिनींच्या किमती वाढल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून राज्य महामार्ग गेले आहेत तर काही ठिकाणी महामार्गाचे काम सुरू आहे. यामुळेच दळणवळणाची साधने वाढली आहेत. उद्योग, व्यवसायासाठी जमिनीची खरेदी होत आहे.
जिल्ह्यातील शहरालगतच्या असलेल्या महामार्गावर प्रती एकरी 50 ते 1 कोटीच्या आसपास भाव मिळत आहे. या वाढलेल्या दरामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत. बीड सारख्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. मात्र सध्या वाढलेले जमिनीचे भाव पाहत शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रस्त्यालगतच्या जमिनी व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर दिल्या जात आहेत.
कोरडवाहू जमिनीलाही भाव
पूर्वी जिल्ह्यामध्ये कोरडवाहू असणाऱ्या जमिनीला एकरी चार ते पाच लाख रुपये इतका दर होता. मात्र, ज्या परिसरामधून राज्य महामार्ग गेले आहेत त्याच जमिनीला सध्या 15 ते 20 लाख रुपये मागणी होत आहे. ज्या बागायती शेती होत्या त्याचा पूर्वी भाव एकरी 25 ते 30 लाख रुपये होतात मात्र याचा भाव सध्या कोटी रुपयांच्या घरात गेला आहे.
Wheat Export : सोलापूर जिल्ह्यातल्या गव्हाची देखील होऊ शकते जगभर निर्यात!
भाडेतत्त्वावर जमीन
राज्य महामार्ग परिसरात हॉटेल व्यावसायिकांचं मोठं जाळ उभारले असून या ठिकाणी मोठमोठे टू स्टार, थ्री स्टार रेस्टॉरंट उभारले जात आहेत. यासह व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला असून काही शेतकऱ्यांनी जागा भाडेतत्त्वावर दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Beed, Farmer, Local18