प्रियांका बोबडे, प्रतिनिधी
अहमदनगर, 3 मार्च: प्रेमाला वयाचं, धर्माचं, भाषेचं, जातीचं कुठलंच बंधन नसतं, असं म्हणतात. पण दोन भिन्न भाषा बोलणाऱ्या दोघांत प्रेम झालं आणि पुढं विवाह झाला तर संवादाचं काय? असा प्रश्न सर्वांनाच पडत असेल. त्यातच कन्नड आणि मराठी भाषेच्या दोघांत प्रेम झालं तर? सीमाभागात कन्नड आणि मराठी भाषावाद नेहमीच डोकं वर काढत असतो. पण या वादात प्रेमानच तोडगा निघू शकतो, असा विश्वास देणारी एक लव्हस्टोरी आहे. अहमदनगरमध्ये राहणारे कानडी नित्यानंद आणि मराठी क्रांती हे दाम्पत्य 33 वर्षे सुखाचा संसार करत आहेत.
कर्नाटकातील नित्यानंद मराठी क्रांतीच्या प्रेमात
नित्यानंद नाईक हे मुळचे कर्नाटकातील धारवाडचे आहेत. अहमदनगरमध्ये एल & टी कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून ते काम करत होते. तेव्हा त्यांची क्रांती संत यांचे मामा शाम रेणाविकर यांच्यासोबत मैत्री होती. रेणाविकर एकदा नाईक यांना क्रांतीच्या घरी घेऊन आले. तेव्हा क्रांती गुलाबजाम घेऊन बाहेर आली आणि तिला पाहून नित्यानंद त्यांच्या प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमाला मामाची संमती होती. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी मामांच्या घरीच होत होत्या. एकमेकांचा विश्वास संपादन केल्यानंतर नित्यानंद यांनी आई-वडिलांना क्रांती यांचा फोटो दाखवला आणि त्यांची संमती मिळाली.
नित्यानंद यांच्या घरी साखरपुडा
नित्यानंद आणि क्रांती यांचा साखरपुडा धारवाड येथे नित्यानंद यांच्या घरी पार पडला. तर 1989 मध्ये अहमदनगर येथे महाराष्ट्रीयन पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला कर्नाटकातून वऱ्हाडी आले होते. दोन्ही कडील विवाहाचे विधी सारखेच असल्याने फार अडचण आली नाही, असे क्रांती सांगतात. विवाहानंतर क्रांती सासरी धारवाड येथे गेल्या.
प्रेमाला वय नसतं! वृद्धाश्रमात 75 वर्षीय आजोबांना भेटलं 'प्रेम'; प्रपोज करत घेतला मोठा निर्णय..Video
अहमदनगरमध्येच फुलला संसार
नित्यानंद यांची नोकरी अहमदनगरला होती. त्यामुळे दोघे अहमदनगर येथेच स्थायिक झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. दोन्ही मुलं नगरमध्येच लहानाची मोठी झाली. आता क्रांती आणि नित्यानंद यांच्या विवाहाला 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, संसारात येणाऱ्या सर्व अडचणींवर त्यांच्यातील प्रेमानं मात केली आहे. त्यामुळेच त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.
भाषेच्या अडचणीवर मात
नित्यानंद मुळचे कानडी असल्याने त्यांना मराठी येत नव्हती. तर क्रांती यांना कन्नड येत नव्हती. दोघांच्या मातृभाषा भिन्न असल्याने त्यांनी पर्यायी हिंदी किंवा इंग्रजीमधून बोलण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे अडचणी कमी आल्या. आता नित्यानंद मराठी शिकले आहेत. मात्र, क्रांती यांना कन्नड येत नाही. तसेच मुलेही नगरमध्येच लहानाची मोठी झाल्याने तीही मराठीतच बोलतात. त्यांनाही कन्नड बोलता येत नाही.
Love Story : वर्गात झाली भेट, 10 वर्ष केली प्रतीक्षा! इतरांच्या आयुष्यात रंग भरणारं अंध जोडपं, Video
खाद्य संस्कृती भिन्न
कन्नड आणि मराठी खाद्य संस्कृती भिन्न आहे. त्यामुळे कर्नाटकचे जेवण बनवणं क्रांतीला थोडं अवघड होतं. मात्र त्या सर्व पदार्थ बनवायला शिकल्या. त्यामुळे आता त्या टिपिकल कन्नडी जेवण बनवतात. भाषा आणि संस्कृती वेगळी असली तरी त्याची अडचण आम्हाला फारशी जाणवली नाही. दोघांनी सोबत जगण्याचा निर्णय घेतल्याने सर्व अडचणींवर मात करत सुखाचा संसार सुरू आहे, असे नित्यानंद आणि क्रांती सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Ahmednagar News, Local18, Love story