नाशिक, 29 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण, त्याआधी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांची यंत्रणा कामाला लागली आहे. सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी कोण आहे, यावरून आता पडदा बाजूला झाला आहे. सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांचे स्टेट्स समोर आले आहे.
सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे नाशिकमध्ये पदवीधर निवडणुकीत चुरस वाढली आहे. भाजप पाठिंबा देणार की नाही, याबद्दल अजून कोणतीही भूमिका तांबे आणि भाजपकडून जाहीर केली नाही. पण, खासदार सुजय विखे पाटील हे कामाला लागले आहे.
(सिद्धिविनायक मंदिर प्रकरण: बांदेकरांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया म्हणाले...)
विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबे यांचे स्टेटस ठेवले आहे. विखे पाटलांच्या जनसेवा ऑफिसच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या स्टेटसवर विजयी भवं असं लिहिलं आहे. शेकडो कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, त्यामुळे पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांसह विखे पाटलांच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या स्टेटसवर सत्यजीत तांबे झळकले आहे. खासदार सुजय विखे यांनी रात्रीतून चमत्कार घडणार असं वक्तव्य केलं होतं. आता अहमदनगर जिल्ह्यातील भाजप सत्यजीत तांबेंच्या पाठीशी उभा राहिल्याचं स्पष्ट होतंय.
(सर्व्हे बनवणारी कंपनी महाविकास आघाडीने तयार केली', रवी राणांचा नवीन शोध)
विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीबाबत प्रसार माध्यमांशी बोलताना सुजय विखे म्हणाले की, पाठिंब्याबाबत पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नाही मात्र आम्ही आघाडीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही. हे स्पष्ट आहे. आम्ही भूमिपुत्र म्हणजेच जिल्ह्यातील उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवाराला पाठिंबा का द्यावा? अशी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची भावना असल्याने त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्ष आणि फडणवीसांना सांगणार आहोत. पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिलेत त्यामुळे जिल्ह्याला जर चांगली संधी मिळत असेल तर त्याचं सोनं केलं जाईल असे सूचक वक्तव्य करत सुजय विखे पाटील यांनी सत्यजित तांबेंच्या पाठीशी उभं राहण्याचे सुतोवाच केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.