Home /News /maharashtra /

'शिवसेनेचा राज्यसभेत पराभव हा NCPमुळेच, राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार', सुजय विखे पाटलांचा खळबळजनक दावा

'शिवसेनेचा राज्यसभेत पराभव हा NCPमुळेच, राष्ट्रवादी शिवसेनेला संपवणार', सुजय विखे पाटलांचा खळबळजनक दावा

राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेना (Shiv Sena) उमेदवाराच्या पराभवामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) हात असल्याचा दावा भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केला आहे.

अहमदनगर, 11 जून : राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election Result) सहाव्या जागेवर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला. धनंजय महाडिक यांचा हा विजय अनपेक्षित असाच होता. कारण महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रणनीती आखण्यात आली होती. पण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सौम्यपणे राजकीय खेळी केल्याने अखेर धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीत शिवसेनेला (Shiv Sena) मोठा फटका बसला आहे. कारण ही निवडणूक शिवसेना आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार (Sanjay Pawar) निवडणुकीच्या रणांगणात होते. पण त्यांचा पराभव झाला. त्यांच्या या पराभवामागे राष्ट्रवादी काँग्रेसचा हात असल्याचा दावा भाजप खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केला आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खेळ करणारा पक्ष आहे. शिवसेनेला संपवण्याचं काम राष्ट्रवादीकडून सुरू आहे", असा घणाघाती आरोप भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केलाय. "मुख्यमंत्र्यांनी हे सर्व षडयंत्र पहावं आणि राष्ट्रवादीपासून दूर व्हावं", असं आवाहनही सुजय विखे पाटील यांनी केलं. "राज्यसभा निवडणुकीत झालेला पराभव हा अपक्षांमुळे नाही तर राष्ट्रवादीच्या खेळीमुळे झालाय. गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचं काम करत आहे. माझं भाकीत खरं ठरताना दिसतंय", असं खासदार सुजय विखे पाटील म्हणाले. (नवी मुंबईत मोठी दुर्घटना, इमारतीचा काही भाग कोसळला, अनेक जण इमारतीत अडकल्याची भीती) "पराभव होतो तेव्हा अनेक कारणं शोधली जातात. मात्र एवढ्या लांब जाण्यापेक्षा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीशी चर्चा करावी. ते सांगतील असं का केलं? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निकाल धक्कादायक नसल्याची प्रतिक्रिया म्हणजे त्यांना हे अपेक्षित होतं. याचा विचार शिवसेनेने करणं गरजेचं आहे", असं सुजय विखे पाटील म्हणाले. खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरदेखील सडकून टीका केली. "महसूलमंत्र्यांचं बदल्यात आणि वाळूच्या ठेक्यात गणित पक्क आहे. त्यांना वाटलं राज्यसभेचं गणितही तसंच आहे. त्यामुळे महसूलमंत्री कन्फ्यूज झाले. आता त्यांना निश्चित कळेल राजकारणाचं आणि बदल्यांचे गणित वेगळे असते", असा घणाघात सुजय विखेंनी केला.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या