नवी मुंबई, 11 जून : नवी मुंबईत एक मोठी दुर्घटना घडली आहे. नवी मुंबईतील जिमी पार्क इमारतीचा (Jimmy Park building) काही भाग अचानक कोसळला (Navi Mumbai jimmy park building portion collapsed). इमारतीमधील काही भाग कोसळून सहाव्या मजल्यापासून ते थेट तळमजल्यापर्यंत आला आणि एक मोठं भगदाड पडल्याचं पहायला मिळालं. या दुर्घटनेनंतर इमारतीत काहीजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नेरूळ (Nerul Navi Mumbai) येथील शनीमंदिर जवळ जिमी पार्क नावाची इमारत आहे. त्या इमारतीमधील एका बाजूचा संपूर्ण भाग कोसळळा आहे. सहाव्या मजल्यापासूनचा भाग कोसळून तळ मजल्यापर्यंत आला. एक प्रकारे इमारतीला भगदाडच पडल्याचं दिसून येत आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच नेरूळ अग्निशमन दलाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. इमारतीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. इमारीतमधून आतापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी चार जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. ही संपूर्ण इमारत रिकामी करण्याचं काम सुरू आहे.
इमारतीचा भाग कोसळून घडलेल्या या दुर्घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी सुद्धा घटनास्थळी बघ्यांनीही मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं.
वाचा : नाशिकमध्ये सलग दोन दिवस पावसाने दैना, एका शेतकऱ्यासह दोन बैलांचा वीज पडून मृत्यू
मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन 48 तास उलटले नाही तोवर इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली. यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आणि शुक्रवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत जोरदार पाऊस बरसला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नवी मुंबईत दुर्घटना घडली आहे.
पावसाळ्यात इमारत कोसळणे, इमारतीचा भाग पडण्याच्या घटना वारंवार घडत असतात. पण आता पहिल्या पावसातच नवी मुंबईत इतकी मोठी दुर्घटना घडल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
पुढचे चार दिवस पावसाचा alert
मान्सून आज (11 जून) अखेर मुंबईतही दाखल झाला आहे. आज डहाणू, मुंबई, ठाणे, रायगडसह महाराष्ट्रातील इतरही भागात पाऊस झाला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान काल पासून मान्सून कोकणात आल्याने राज्यातील अनेक भागात मान्सूनच्या सरी बरसत आहेत.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधूदूर्ग, तसेच मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.