अहमदनगर, 18 जुलै: एखादी नदी केवळ पाच फुटाच्या सांडव्यातून वाहतेय असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. परंतु, अहमदनगर जिल्ह्यातील मुळा नदीबाबत ही माहिती खरी आहे. अकोले तालुक्यातील शिसवद येथील दुर्लक्षित निसर्गशिल्प म्हणून अशा एका सांडव्याची ओळख आहे. जिथून आपण एका टांगेत नदी पार करू शकता. अस्वल उडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणावरून आता जोरात पाणी वाहत आहे. अनेकांना हा निसर्गाचा चमत्कार वाटत असून हा परिसर पर्यटकांना भुरळ घालतोय. दुर्लक्षित निसर्गशिल्प अस्वल उडी अकोले तालुक्यातील शिसवद गावातील एक अनोखे दुर्लक्षित निसर्गशिल्प म्हणून सांडव्याची ओळख आहे. हरिचंद्रगडाकडून प्रचंड वेगाने व अवखळपणे वाहत येणारी मुळा नदी शिसवद गावाजवळून खडकाच्या पोटातून वाहते. या ठिकाणी नदी एका टांगेत ओलांडता येते अशी निसर्गनिर्मित जागा आहे, ज्यास सांडवा किंवा अस्वल उडी म्हणून ओळखले जाते.
पूर्वीच्या काळी नदी ओलांडण्याची जागा पूर्वीच्या काळी या जागेचे खूप महत्त्व होते. पावसाळ्यात मुळा नदीला पूर आल्यानंतर राजुरहून पाचनई, पेठेचीवाडी, खडकी, हरिचंद्रगडाकडे जाण्याचा हा एकमेव मार्ग होता. म्हणजेच मुळा नदीचे हे अथांग पात्र ओलांडण्याची ही एकमेव जागा होती. सध्या कळसुबाई-हरीचंद्रगड परिसरात जोरदार मोसमी पाऊस बरसत असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे सांडवा अर्थातच अस्वल उडी प्रवाहित झाली असून प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. कसा आहे सांडवा? अकोले शहरापासून साधारण 35 किलोमिटर अंतरावर असणाऱ्या शिसवद गावाजवळून मुळा नदी प्रवाहित होते. या परिसरात पर्जन्यमान जास्त आहे. हरिचंद्रगड परिसरातून उगम पावणारी मुळा नदी या परिसरातील जास्त पावसामुळे शिसवद गावापर्यंत पूर्ण प्रवाह भरून तुडुंब वाहते. मात्र शिसवद गावातील नदीच्या खोऱ्यात असणाऱ्या 5 फूट रुंद आणि 50 फूट खोलीच्या सांडव्यातूनच प्रवाहित होते. या परिसरातील खोलगट भूभागामुळे मुळा नदी प्रचंड वेग धारण करते. त्यामुळे हा अद्भुद नजारा डोळ्यात भरण्यासारखा झाला आहे. एका टांगेत ओलांडता येते नदी, पाहा काय आहे ‘अस्वल उडी’ प्रकार? ‘अस्वल उडी’ नावाची आख्यायिका या सांडव्याला अस्वल उडी म्हणून देखील ओळखलं जातं. परिसरातील वयस्करांना विचारलं असता ते या ठिकाणाबद्दल एक आख्यायका सांगतात. एकदा एक मदारी अस्वल (नडाग) घेऊन या ठिकाणाच्या सहाय्याने नदी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र उडी मारताना अस्वलाचा पाय घसरला आणि ते या सांडव्यात पडले. अस्वलाबरोबर त्याच्या मदारीही त्यात ओढला गेला. येथे नदीच्या पात्राची खोली खूप असल्याने मदारी व अस्वल पाण्यातून वरती येऊ शकले नाही. त्यामुळे मदारी व अस्वलाच्या या कहाणीमुळे या सांडव्याला अस्वल उडी, नडाग उडी असे नाव पडले आहे, असं स्थानिक सांगतात.