अहमदनगर, 30 नोव्हेंबर : परिस्थिती कितीही सामान्य असली, तरी मेहनतीच्या बळावर उत्तुंग भरारी घेता येते, असे अहमदनगर येथील विशाल पवार या तरुणाने सिद्ध केले आहे. विशालचे वडील हे गवंडी काम करतात तर त्याची आई ही शिवणकाम करते. घरची परिस्थिती साधारण असताना त्याने 10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास करत देशातील सर्वात कठीण यूपीएससीची सीडीएस ही परिक्षा पास केली आहे. यानंतर तो आता भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्त होणार आहे.
विशालचा ध्येयवेडा प्रवास -
विशालने प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवले. विशाल हा अहमदनगर जिल्ह्यातील बुरूडगाव येथे 10 बाय 10 च्या खोलीत वडील राजेंद्र, आई सुनीता आणि आपल्या आजीसह राहतो. त्याचे पहिले ते चौथीचे प्राथमिक शिक्षण हे बुरूडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर 10 वी पर्यंतचे शिक्षण हे अहमदनगरच्या रुपीबाई बोरा विद्यालयात झाले.
दहावीनंतर त्याने अहमदनगरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. घरची परिस्थिती साधारण असल्याने क्लासेस लावणे शक्य नव्हते. त्यामुळे विशालने एक वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली. त्यातून पैसे जमा करून पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली.
पहिल्या प्रयत्नात त्याला अपशय आलं. मात्र, त्याने न खचता 10 एप्रिलला पुन्हा सीडीएसची परीक्षा दिली. यामध्ये त्याला यश मिळालं. सप्टेंबर महिन्यात बंगळुरू येथे त्याची मुलाखत झाली. त्यातही विशालने यश मिळवलं. यानंतर मेडीकल आणि इतर सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर मागील आठवड्यात निकाल प्रसिद्ध झाला.
हेही वाचा - Life@25 : खान्देशचे सुपूत्र IAS अधिकारी मनोज महाजन ओडिशात बजावताएत सेवा, तरुणाईला देतात 'हा' सल्ला
त्यात भारतीय सैन्यदलासाठी त्याचा देशात टॉप 100 मध्ये 61 वा नंबर आला आहे. तर नेव्हीसाठी टॉप शंभर मध्ये 20 वा नंबर आला आहे. अगदी लहानपणापासूनच आर्मीत जाण्याचे विशालचे स्वप्न होते. ते स्वप्न आता त्याचे पूर्ण झाले आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही त्याने न डगमगता प्रामाणिकपणे काम केले. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar News, Career, Success story, Upsc, Upsc exam