मुंबई, 11 मार्च : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल (five states assembly election result) काल (10 मार्च 2022) जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यांत आपली सत्ता राखली आहे. उत्तरप्रदेशात पुन्हा एकहाती सत्ता मिळवण्यातही भाजपला यश आले आहे. भाजपच्या या यशानंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने भाजपच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात एकूण 288 आमदार आहेत. त्यापैकी 105 आमदार हे भाजपचे आहेत. तर इतर 17 आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे. सत्तेत येण्यासाठी भाजपला आणखी काही आमदारांची आवश्यकता आहे. त्यासाठी भाजपकडून आता आखणी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या संदर्भात भाजपकडून जुना मित्र असलेल्या शिवसेनेला (Shiv Sena) ऑफर दिली जाणार असल्याची शक्यता आहे. जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नकार आला तर शिवसेनेचे काही आमदार फोडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबतही हातमिळवणी कऱण्याची भाजपची तयारी असल्याचं बोललं जात आहे. लोकमत ने या संदर्भात वृत्त दिलं आहे. वाचा : Assembly Elections नंतर महाराष्ट्रात घडणार मोठी उलथापालथ? मोदींची सूचक वक्तव्य महाआघाडीच्या थेट वर्मावर शिवसेनेला ऑफर उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या चार राज्यांत पुन्हा सत्ता स्थापन केल्याने महाराष्ट्र भाजपचा आत्मविश्वासही वाढला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर भाजपने गोव्यात एकहाती सत्ता स्थापनेसाठी आवश्यक बहुमत मिळवलं आहे. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप पूर्ण बहुमताने येईल त्यासाठी आमची तयारी सुरू आहे. याच दरम्यान जर महाविकास आघाडी सरकार पडलं तर आम्ही आमचं सरकार बनवू. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काही तारखा घोषित करून या तारखांना बॉम्ब पडेल, असं विधान केलं होतं. त्यामध्ये 11 मार्च ही तारीख होती. ‘मी ज्या ज्या तारखांना बॉम्ब पडणार असं सांगितलं होतं, ते ते घडत गेलं आहे. आता 11 तारखेला काय होतं ते पाहूया’, असं पाटील पुन्हा म्हणाले. ‘संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी आवरले पाहिजे. कारण राऊत लोकसत्तेत जातील उद्या तरूण भारतमध्ये येतील. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य यांना भविष्य आहे. त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे, असा सल्लावजा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.