परभणी, 17 मे : परभणीकरांसाठी आजची सकाळ धडधड वाढणारी बातमी घेऊन आली आहे. जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोनाबाधित महिला रुग्ण आढळून आली आहे. कोरोनापासून बचावासाठी महिलेनं मुंबई सोडून थेट गाव गाठलं. मात्र गावी पोहोचलेल्या याच 50 वर्षीय महिलेला कोरणाची बाधा झाल्याचे समोर आलं आहे. या महिलेला परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. मुंबईमधील गोरेगाव परिसरामधून, ही महिला परभणीमध्ये आली होती. त्यानंतर तिचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला आणि त्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान, महिलेला दवाखान्यामध्ये दाखल केलेले असताना, शहरातील मिलिंद नगर भागात राहणाऱ्या महिलेच्या काही नातेवाईकांनी तिची दवाखान्यामध्ये येऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून, प्रशासनाने मिलिंद नगर आणि आजूबाजूचा परिसर सील करण्यास सुरुवात केली आहे. तसंच महिलेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांच्या तपासणीचे कामही सुरू करण्यात आले आहे. हेही वाचा - सिंधुदुर्गात नियम बदलले, कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती या अगोदर परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये मुंबई येथून आलेले तीन कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यानंतर आज चौथा रुग्णही मुंबई येथून आलेला आढळल्याने, परभणीकरांची चिंता वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.