पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर केले चाकूने सपासप वार; भावाने धाव घेतली, पण...

पुण्यात चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर केले चाकूने सपासप वार; भावाने धाव घेतली, पण...

रागाच्या एका क्षणामुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आणि संतोष आणि वृषालीची मुलगी आईच्या मायेपासून दूर गेली.

  • Share this:

पुणे, 17 मे : लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसाचार वाढल्याची आकडेवारी समोर येत असतानाच पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने चाकूने भोसकून पत्नीची हत्या केली आहे. सिंहगड रोडवरील धायरी येथील महादेवनगर इथं हा प्रकार घडला आहे. वृषाली सुरगुडे असं हत्या करण्यात आलेली महिलेचं नाव आहे.

वृषाली आणि तिचा पती संतोष सुरगुडे यांचा 8 वर्षापूर्वी विवाह झाला होता. ते दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला होते. मात्र गेल्या काही काळापासून संतोष हा पत्नी वृषालीवर चारित्र्याचा संशय घेत होता. याच मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत असे. शनिवारी सायंकाळीदेखील या दोघांमध्ये भांडण सुरू झालं.

सुरुवातीला शाब्दिक चमकीपर्यंत मर्यादित असलेलं हे भांडण नंतर मात्र टोकाला गेलं. यावेळी रागाच्या भरात संतोषने थेट चाकू हातात घेतला आणि वृषालीवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. नंतर त्याने तिच्या पोटात चाकू भोसकला. जखमी वृषालीच्या किंचाळण्याचा आवाज पोहोचताच वरच्या मजल्यानंतर राहात असलेल्या संतोषच्या भावाने धाव घेतली.

जखमी अवस्थेतील वृषालीला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेईपर्यंतच तिने श्वास सोडला होता. रागाच्या एका क्षणामुळे संपूर्ण कुटुंब उद्धवस्त झालं आणि संतोष आणि वृषालीची मुलगी आईच्या मायेपासून दूर गेली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी संतोष कुरमुडे याला ताब्यात घेतलं आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. याबाबत 'लोकमत'ने वृत्त दिलं आहे.

संकलन, संपादन - अक्षय शितोळे

First published: May 17, 2020, 4:00 PM IST

ताज्या बातम्या