नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 27 ऑगस्ट : राज्यभरात बैलपोळा शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला. मात्र, जळगाव जिल्ह्यातील वावडदा इथं एक बिथरलेला बैल घराच्या छतावरून कोसळल्याची घटना घडली आहे. बिथरलेल्या बैल छतावरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. जळगाव जिल्ह्यात मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला. वावडदा येथील गोकूळवाडा येथे शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवले होते. मात्र, संध्याकाळच्या सुमारास एक बैल अचानक एका घराच्या छतावर चढला. आता या बैलाला खाली कसे आणायचे असा मोठा प्रश्न बैलाच्या मालकाला पडला.
त्यामुळे एक तरुण छतावर चढला आणि बैलाला खाली हुसकावून लावत होता. तर दुसरा तरुण बैलाला पकडण्यासाठी जिन्यावर थांबला होता. पण, बिथरलेल्या बैलाला खाली उतरता येत नव्हते. छताच्या कोपऱ्यावर आला असता पाय खाली घसरला आणि बैल थेट खाली कोसळला. खाली पडल्यावर बैलाला मार लागला आणि डोक्यातून रक्तस्त्रावर झाला. खाली सिमेंट काँक्रीटचा रोड असल्याने या घटनेत नंदीबैल गंभीररित्या जखमी झाला आहे. जखमी बैलाला तातडीने पशू वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ऐन बैलपोळा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे वावडदा गावात खळबड उडाली आहे. (Video : पाण्यालाच लागली आग! हँडपंपमधून पाण्यासह उठले आगीचे लोळ) दरम्यान, शुक्रवारी मोठ्या उत्साहाने बैलपोळा सण साजरा करत बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शेतकरी बांधवांनी यादिवशी मनोभावे आपल्या बैलांची पूजा केली. त्यांना गोड पुरण पोळीचा नैवेद्य खावू घातला. त्यांचं दर्शन घेतलं, कारण वर्षेभर बैल शेतात राबत असतात. मात्र, बैलपोळ्याच्या सणादिवशी भंडाऱ्यात घडलेल्या एका अजब घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
भंडाऱ्यात एका बैलाने नशेत असलेल्या आपल्या मालकाला धडा शिकवल्याचं पाहायला मिळालं pic.twitter.com/Y1MM0mwdx0
— News18Lokmat (@News18lokmat) August 27, 2022
या बैलाने दारूच्या नशेत असलेल्या मालकाला चक्क शिंगावर घेऊन उचलून फेकल्याचं पाहायला मिळालं. व्हिडिओमध्ये दिसतं की, मालक आपली बैलजोडी घेऊन गल्लीतून जात आहे. त्याने या बैलानं सजवलं असून नशेतच तो बैलांना घेऊन जात आहे. मात्र, मालकाचं हे वागणं बैलाला फारसं पटलेलं दिसत नाही. मालक बैलांना घेऊन चाललेला असतानाच यातील एक बैल अचानक या दारूड्या व्यक्तीला आपल्या शिंगावर उचलतो आणि खाली फेकतो. या घटनेनंतर आसपासचे लोकही घाबरतात. मात्र, मालकाची नशाच बैलाने उतरवल्याचं पाहायला मिळतं.

)







