भोपाळ, 26 ऑगस्ट : एखाद्या वस्तूने पेट घेतला तर साहजिकच त्यावर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवलं जातं. पण हँडपंपातून (Hand Pump) पाण्यासह आगीचे लोळ येत असतील तर ही बाब सर्वांना आश्चर्यचकित करणारी आहे. असचं काहीसं मध्य प्रदेशातील बकस्वाहा तालुक्यातील कछार गावात पाहायला मिळतंय. इथं एका हँडपंपमधून पाण्यासह आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरल्याचं चित्र आहे. गावातील काही लोक मात्र हा चत्मकार असल्याचं सांगत आहेत. ‘डीएनए हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय. ग्रामीण भागात जिथं घरोघरी नळ पोहोचलेले नाहीत, अशा ठिकाणी नागरिकांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून सरकारी योजनेतून ठिकठिकाणी हँडपंप आढळून येतील. तिथं रांग लावून ग्रामस्थ पाणी घेऊन जात असतात. कछार गावातील लोकांची पाण्याची गरज भागावी म्हणून इथंही हँडपंप लावलेला आहे. पण यातून पाण्यासोबतच आगीचे लोळ उठत असल्यानं नागरिक चकित अन् भयभीतही झाले आहेत. सुरुवातीला काही व्यक्तींना ही घटना दिसून आली. त्यानंतर पाहता पाहता ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण गावात पसरली आणि हा प्रकार पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. हँडपंपमधून पाण्यासोबत आगीचे लोळ उठत असल्याचं पाहून काहींनी याचे व्हिडिओ तयार केले व ते सोशल मीडियावर शेअर करण्यास सुरुवात केली. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
प्रशासनाच्या मते, तपासणीनंतरच कारण कळेल मुख्यालयापासून कछार हे गाव 10 किलोमीटर अंतरावर आहे. पाण्यासोबत आगीच्या ज्वाळा निघत असल्याची बाब पाहिल्यानंतर गावातील काही लोकांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली. गावात येऊन तपासणी झाल्यानंतरच याबाबत अधिक सांगता येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. काही ग्रामस्थांच्या मते मात्र ही घटना एक चमत्कारच आहे. तर रसायनांमुळे (Chemicals) हा प्रकार घडला असावा अशी शक्यता काही जणांकडून व्यक्त केली जात आहे. चत्मकार नसून भूगर्भातील गॅसमुळे घडतोय प्रकार हँडपंपामधून पाण्यासोबत आगीच्या ज्वाळा निघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. आयआयएस (Indian Information Service) अधिकारी @Gurmeet_Singhhh या नावाच्या हँडलवरून ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला गेलाय. शेकडो युजर्सनी तो पाहिला आहे. काही भूगर्भ वैज्ञानिकांच्या मते, हा काही चत्मकार वैगेरे नाही. तर तो सर्वसाधारण हायड्रोकार्बन (मिथेन) वायू निर्माण झाल्याने घडलेला प्रकार असू शकतो. खडकाळ क्षेत्रात वनस्पतींचे अवशेष दलदलीच्या भागात एकत्र जमा होतात. त्यामुळे तिथे भौतिक-रासायनिक प्रक्रिया होऊन मिथेन वायूची (Methane Gas) निर्मिती होते. वायू तापल्यानंतर त्याची घनता कमी होते. त्यामुळे वायूच्या खाली असलेलं भूगर्भातील पाणीही आगीच्या ज्वाळांसोबत बाहेर पडतं.