मुंबई, 31 ऑक्टोबर : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आखाडा तापला आहे. भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांवर एकपाठोपाठ आरोप सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबई पालिकेमध्ये झालेल्या 76 कामांची थेट कॅगकडून चौकशी होणार आहे. त्यामुळे आगामी काळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर शिवसेनेला घेरण्याची रणनीती भाजपने आखली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅग मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारने मागणी केली होती. कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग म्हणजेच (कॅन्टोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचे वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी त्यांचे नियमबाह्य पद्धतीने झालेले कामाचे वाटप हे सारे चौकशीच्या फेऱ्यात आणले जाणार आहेत. (‘सत्तार मला कधीही आऊट करणार नाही, नेहमी जिंकण्यासाठीच..’; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने पिकला हशा) कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी टेंडर प्रक्रिया न राबवता तातडीने सोयीसुविधा उभारण्याला आणि वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. मात्र या अधिकाराचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारंवार भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता. कोरोना काळामध्ये कोविड सेंटर उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या मुंबई पालिकेच्या 76 कामांची कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरून पालिकेचे विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती ‘कॅग’नं मान्य केली.
पालिकेने शहरात उभारलेल्या करोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केला होता. त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उभय सभागृहात केली होती. (राणा-कडू वाद अखेर मिटला? वर्षावरील चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया) राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार, संबंधित प्रकरणाची तपासणी करण्याची तयारी ‘कॅग’ने दर्शवली आहे. लवकरच ‘कॅग’चे पथक पालिकेत दाखल होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज्यातील सत्ताधारी यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत. मुंबई पालिकेची ‘कॅग’कडून चौकशी - 12 हजार कोटींच्या कामांत गैरव्यवहाराचा संशय - 76 कामांची कॅगकडून चौकशी - कोरोनाकाळात विविध बाबींवर खर्च 3538 कोटी - दहिसर इथं अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटींना खरेदी - चार पुलांच्या बांधकामावर 1496 कोटींचा खर्च - कोरोनाकाळात 3 रुग्णालयांत 904.84 कोटींची खरेदी - शहरातील 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवर 2286.24 कोटींचा खर्च - सहा सांडपाणी प्रकल्पांवर 1084.61 कोटींचा खर्च - घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवर 1020.48 कोटींचा खर्च - 3 मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी 1187.36 कोटींचा खर्च