बीड, 06 जुलै : बीड जिल्ह्यात आत्महत्या (Beed district suicide cases) करणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचा आकडा चिंता वाढवत असल्याचे दिसून येत आहे. रोज एक शेतकरी मृत्यूला (farmer suicide) कवटाळत असल्याचे आकडेवारीवरून माहिती समोर आली आहे. मागच्या एका महिन्यात दिवसाला एक शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. जानेवारी 2022 ते जून 2022 या मागच्या सहा महिन्यात 181 दिवसांत 138 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Beed district suicide cases hike) केल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा आत्महत्यांचा आकडा 54 ने अधिक आहे.
शेतकरी आत्महत्यांच्या कर्जबाजारीपणासह इतर प्रचलित कारणांत 'कोविड' संसर्गाचा विळखा हे देखील प्रमुख कारण असल्याचे जिल्हा रूग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मोमीन मुजाहेद यांचे मत आहे. कोविड आजारावरील उपचाराचा खर्च, लॉकडाऊनमुळे आलेला एकलकोंडेपणा व त्यामुळे झालेली चिडचिड, विस्कटलेली आर्थिक घडी आणि बेरोजगारी ही आत्महत्यांची कारणे असल्याचे मुजाहेद यांनी दैनिक अॅग्रोवनला माहिती दिली.
हे ही वाचा : शपथपत्र लिहून देणारे शाखाप्रमुख शिंदे गटाकडे निघाले, शिवसेनेची भिंतही कोसळली!
बीड जिल्ह्यात कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ पडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात पीक कर्जमाफीतील त्रुटी, पीक कर्जवाटपातील दिरंगाई, हमी भाव, उत्पादित मालासाठी बाजारपेठ नसणे या कारणांनी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्यातून कर्जबाजारीपणा व कर्ज फेडण्याच्या चिंतेतून शेतकरी आत्महत्यांच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर कोरोनाकाळात नुकसानीत गेलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
यंदा जानेवारी ते जून या सहा महिन्यांतील 181 दिवसांत तब्बल 138 शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. हाच आकडा मागच्या वर्षीच्या (2021) सहा महिन्यांत 84 होता. म्हणजेच तुलनेने यंदा 54 आत्महत्या अधिक झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे जून महिन्याच्या 30 दिवसांत जिल्ह्यात 30 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.
हे ही वाचा : Video शिंदे- भाजप सरकार येताच, भास्कर जाधव लागले शेतीच्या कामाला
पूर्वी जिल्ह्यातील शेतकरी व मजूर व अप्रशिक्षित सुशिक्षित बेरोजगार कामासाठी मुंबई पुणेसह अन्य ठिकाणी जात. लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे त्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे किंवा भविष्यातील योजनांचे नियोजन पूर्णत: विस्कटले. बाजारपेठेत अद्यापही उठाव आलेला नाही. आभासी जगणे वाढले आहे. परिणामी सामाजिक कार्यातील सहभाग, लोकांत मिसळणे कमी झाले. कोविड आजारावरील उपचाराचा खर्च, लॉकडाऊनमुळे एकलकोंडेपणामुळे स्वभावात चिडचिडेपणा येऊन सहनशीलता कमी झाली आहे. असे डॉ. मुजाहेद यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Beed news, Suicide case, Suicide news, Three farmer commits suicide