अमरावती, 28 ऑगस्ट : अमरावती (amravati) जिल्ह्यामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यात्रेमध्ये फुगे विकण्यासाठी आलेल्या एका विक्रेत्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरचा ( gas cylinder explodes ) भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एका 2 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. या चिमुरडीचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील ताना पोळ्याच्या निमित्ताने यात्रा भरवण्यात आली होती. दरवर्षी ही यात्रा भरवली जात असते. त्यामुळे गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी यात्रेत लहान मुलांसाठी खेळणीची दुकानं सजली होती. या यात्रेमध्ये हवेत उडणारे अर्थात गॅसचे फुगे विकण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. मात्र गॅसचे फुगे विकणाऱ्याकडे असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे दोन वर्षीय बालिकेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला आणि याचा तिचा मृत्यू झाला. (भाडेकरूंना तब्बल ६० लाखांचा चुना, नवी मुंबईत डिपॉझिटवर घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक) परी सागर रोही असं मृतक चिमुकलीचं नाव असून ती आपल्या आजोबासोबत गावाकडील तान्हा पोळ्याच्या यात्रेत गेली होती. उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबासोबत फुगे विक्रेत्याजवळ गेली होती. आजोबानेही लाडाने आपल्या नातीला फुगा घेऊन देण्यासाठी घेऊन गेले होते पण अचानक फुगे विक्रेता जवळील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये परी रोही ही चिमुरडी गंभीररित्या जखमी झाली. हा स्फोट इतका भीषण होता की, परीचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. तिला तातडीने उपचारासाठी अचलपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अचानक सिलेंडरच्या स्फोटाने यात्रेत खळबळ उडाली. 2 वर्षांच्या परीच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.