नवी मुंबई, 27 ऑगस्ट : नवी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी हेवी डिपॉझिट घेऊन भाड्याने घर देण्याचा प्रकार सध्या प्रमाणात वाढत चालला आहे. या प्रक्रियेमध्ये भाडेकरूला डिपॉझिटची रक्कम द्यायची असते आणि एका विशिष्ट कालावधीनंतर ही संपूर्ण रक्कम परत मिळते. मात्र, यातून भाडेकरुंची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. एका टोळीने घर देण्याच्या नावाखाली सहा भाडेकरुंची तब्बल 60 लाखांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - भाड्याच्या घराच्या नावाखाली मोठी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. डिपॉझिटवर देऊ असे सांगत तब्बल 60 लाखांना गंडा घातला गेला. विशेष म्हणजे यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता याप्रकरणी थेट नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना साकडे घातले आहे, असे फसवणूक झालेल्यांनी शनिवारी सांगितले. फसवणूक झालेल्यांची नावे अशी - मागील 4 वर्षात वाशी सेक्टर 15 येथील एकच घर सहा वेगवेगळ्या लोकांना दाखवण्यात आले आणि हेवी डिपॉझिटच्या नावाखाली तब्बल ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. सपना बाबूशंकर पाल, सुदालाल कोणार, मूथू लक्षमी, चाँद मोहम्मद मोमीन व रजिया चाँद मोमीन, साजरा इक्राम खाखरा आणि अफरोज इन्तेखाब खान अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. हेही वाचा - सांगली : पतीने मोबाईलचा लॉक उघडून दिला नाही म्हणून पत्नीचं भयानक पाऊल, दुसऱ्या रुममध्ये जाऊन… या सर्वांनी मासिक घरभाडे वाचविण्यासाठी त्यांनी आपल्याकडील सर्व जमा रक्कम हेवी डिपॉझिटच्या घरासाठी दिली आहे. याप्रकरणी संबंधितांनी त्यावेळी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार केली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता त्यांनी थेट पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनाकडे धाव घेत त्यांना याप्रकरणी साकडे घातले आहे. याप्रकरणी आता पुढे काय कार्यवाही होते, ते पाहणे महत्त्वाचे आहे. मात्र, या घटनेमुळे घर भाड्याने देण्याच्या नावाखाली डिपॉझिटची मोठी रक्कम घेत फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.