नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : प्रेम आणि रिलेशनशीपमधील रोमान्सचा आनंद साजरा करण्यासाठी व्हॅलेंटाईन्स डे हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी, रिलेशनशीपमधील जोडपी रोमँटिक भेटवस्तू, फुलं आणि कार्ड्सद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. इतिहासाचा आढावा घेतल्यास प्रेम ही संकल्पना फार प्राचीन असल्याचं लक्षात येतं. इतिहासातील अनेक जोडप्यांनी आपल्या प्रेमातून अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे. या जोडप्यांच्या वास्तविक जीवनातील प्रेमकथा आपल्याला प्रेमाचं सामर्थ्य आणि रोमान्सचा पुरावा देतात. 1. शाहजहान आणि मुमताज महल: शाहजहान हा भारतातील पाचवा मुघल सम्राट होता आणि मुमताज महल त्याची सर्वांत आवडती पत्नी होती. त्यांना 14 मुलं होती. मुमताज महलनं सर्व लष्करी मोहिमांमध्ये शाहजहानची सोबत केली. त्यांच्या 14 व्या मुलाच्या जन्मावेळी मुमताज महलचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर शाहजहान मानसिकदृष्ट्या पूर्ण खचून गेला होता. तिच्यावरील प्रेमाचं प्रतीक म्हणून, त्यानं ताजमहाल बांधण्याचा निर्णय घेतला. हाच ऐतिहासिक ताज महाल प्रेमाचं सर्वांत मोठं प्रतीक मानला जातो. हेही वाचा - रोमँटिक वेडिंग फोटोशूट करताना कपलसोबत घडला भयंकर प्रकार, VIDEO VIRAL 2. डांटे आणि बीयेट्रिस: प्रसिद्ध इटालिअन कवी डांटे अॅलिगेरी आणि बीयेट्रिस पोर्टिनारी संपूर्ण आयुष्यात फक्त दोनदा एकमेकांना भेटले होते. पहिल्या भेटीच्यावेळी डांटे नऊ वर्षांचा होता. नंतर प्रौढ झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची भेट झाली होती. इटालियन नोबलवुमन असलेल्या बीयेट्रिसला डांटेची प्रेरणा मानलं जातं. पाश्चात्य साहित्यातील सर्वांत चिरस्थायी साहित्यापैकी एक असलेल्या ‘द डिव्हाईन कॉमेडी’ची प्रेरणा बीयेट्रिस होती. 3. बाजीराव आणि मस्तानी: पेशवे बाजीराव आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांची प्रेमकथा संपूर्ण भारतात, विशेषतः महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. दोघांनी सुरुवातीला एका राजकीय कराराचा भाग म्हणून लग्न केलं होतं. त्यांचा मृत्यू होईपर्यंत म्हणजे फक्त 6 वर्षे दोघांचं लग्न टिकलं. या प्रेमकथेमागील सर्व इतिहास अद्याप उघड झालेला नाही, असं म्हणतात. मस्तानीकडे दुर्लक्ष करण्यासाठी बाजीरावांना सामाजिक आणि राजकीय दबावाचा सामना करावा लागला, हे नाकारता येत नाही. पण, त्यांनी तसं करण्यास नकार दिला, अशी इतिहासात नोंद आहे. 4. राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट: राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्टची प्रेमकथा राजकीयदृष्ट्या सोयीस्कर असलेल्या विवाहापासून सुरू झाली. त्यांचं लग्न हे ठरवून झालेलं असलं तरी पुढच्या काही दशकांत ते एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांनी एकमेकांना लिहिलेली असंख्य पत्रं आणि जर्नल्सवरून त्यांच्या प्रेमाची व्याप्ती स्पष्ट होते. प्रिन्स अल्बर्टच्या मृत्यूनंतर राणी व्हिक्टोरियानं तिचं उर्वरित आयुष्य शोक करण्यात घालवल्याचं म्हटलं जातं. 5. फ्रिडा कॉहलो आणि डिएगो रिव्हेरा: मेक्सिकोतील प्रसिद्ध चित्रकार डिएगो रिव्हेरा आणि फ्रिडा काहलो यांचं नातं 20 व्या शतकातील सर्वांत खळबळजनक आणि उत्कट प्रेमकथांपैकी एक होतं. त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार येऊनही त्यांचं एकमेकांवरील प्रेम कायम राहिलं. त्यांनी एकमेकांचे असंख्य पोर्ट्रेट रेखाटले. नोंदीनुसार, त्यांनी दोनदा एकमेकांशी लग्न केलं होतं. हेही वाचा - लग्न मंडपात जाण्याऐवजी वधू पोहोचली भलत्याच ठिकणी, Video होतोय व्हायरल 6. क्लिओपात्रा आणि मार्क अँटनी: रोमन शासक मार्क अँटनी आणि इजिप्तची राणी क्लिओपात्रा यांची प्रेमकथा विल्यम शेक्सपियरच्या नाटकात चित्रित करण्यात आली होती. त्यांची प्रेमकथा ही सर्वकालीन प्रसिद्ध प्रेमकथांपैकी एक मानली जाते. त्यांच्या नात्यामुळे इतिहास अक्षरशः बदलून टाकला होता. हे अस्थिर पण मजबूत नातं अँटनी आणि क्लिओपात्रा यांनी आत्महत्या केल्यानं संपुष्टात आलं होतं. 7. जोसेफिन आणि नेपोलियन बोनापार्ट: फान्सचा सम्राट नेपोलियन बोनापार्ट जेव्हा जोसेफिन डी ब्युहार्नेला भेटला होता तेव्हा ती एक विधवा होती. ती त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी होती आणि तिला आधीच दोन मुलं होती. बोनापार्टने राजकीय डावपेचांचा भाग म्हणून तिच्याशी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नानंतर काही दिवसांतच तो लष्करी मोहिमेवर निघून गेला होता. नात्यामध्ये अस्थिरता असूनही दोघांचं एकमेकांवरील प्रेम वाढत गेलं. जेव्हा जोसेफिनला गर्भधारणा होऊ शकली नाही, तेव्हा दोघांनी आतापर्यंतचा सर्वांत मैत्रीपूर्ण घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या कार्यवाहीवेळी दोघांनी एकमेकांसाठी प्रेमपत्रं वाचली होती, असं म्हटलं जातं. घटस्फोट होऊनही दोघांच्या मनातील प्रेम कमी झालं नाही. नेपोलियन मृत्यूच्यावेळी उच्चारलेल्या शेवटच्या शब्दांमध्येही तिचं नाव होतं. “फ्रान्स, सैन्य, सेनाप्रमुख, जोसेफिन,” असे शब्द उच्चारून नेपोलियननं शेवटचा श्वास घेतला होता.
8. ऑस्ट्रियाची सम्राज्ञी सिसी आणि फ्रांझ जोसेफ: ऑस्ट्रियाची सम्राज्ञी एलिझाबेथ हिला ‘सिसी’ या नावानं ओळखलं जात असे. सिसी आणि सम्राट फ्रांझ जोसेफ यांची प्रेमकथा अतिशय सुंदर होती. सिसी स्वतंत्र विचारसरणीची आणि स्वच्छंदी होती, तर फ्रांझ जोसेफ ऑस्ट्रियाचा सम्राट आणि हंगेरीचा राजा होता. राजकीय संबंधाचा एक भाग म्हणून दोघांचं फार कमी वयातच लग्न झालं होतं. त्यांच्या भिन्न व्यक्तिमत्त्वांमुळे काही दशकांनंतर दोघांचं लग्न संपुष्टात आलं. पण, तरीही दोघांमध्ये शेवटपर्यंत फार जवळीक होती. सिसीची हत्या झाली तेव्हा फ्रांझ जोसेफ म्हणाला होता, “तुम्हाला कल्पना नाही की मी या महिलेवर किती प्रेम करतो.” 9. ग्रेस केली आणि प्रिन्स रेनियर: ग्रेस तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एक हॉलीवूड अभिनेत्री होती तर प्रिन्स रेनियर मोनॅकोचा शासक होता. दोघांची प्रेमकथा डिस्ने चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशी होती. ग्रेस मोनॅको देशात शूटिंग करत होती तेव्हा दोघांची भेट झाली होती. दोघेही लगेचच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एक मूव्ही स्टार असलेली ग्रेस वास्तविक जीवनात राजकुमारी बनली. दोघेही आयुष्यभर एकमेकांप्रती समर्पित राहिले. राजकुमारी ग्रेस 1982 मध्ये कार अपघातात मरण पावली. त्यानंतर प्रिन्स रेनियरनं पुन्हा लग्न केलं नाही. 2005 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना त्यांच्या पत्नीच्या शेजारीच दफन करण्यात आलं.