नवी दिल्ली, 23 एप्रिल : एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढते आहे. अशात आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने कोरोना रुग्णांवर उपचारासाठी झायडस कॅडिलाच्या (Zydus cadila) विराफिन (Virafin) या अँटिव्हायरल औषधाला मंजुरी दिली आहे.
झायडस कॅडिलाचं इंटरफेरॉन अल्फा - 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin या अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखलं जातं. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) केली होती. डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे.
Drugs Controller General of India (DGCI) approves emergency use for Zydus Cadila's Pegylated Interferon alpha-2b, ‘Virafin’ for treating moderate #COVID19 infection in adults. pic.twitter.com/bXBvHZaIBp
— ANI (@ANI) April 23, 2021
झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी. हिपेटायटिस सी साठी हे औषध तयार करण्यात आलं होतं. 10 वर्षांपूर्वी या यकृतासंबंधी आजारावर उपचारासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली होती. आता हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली होती.
हे वाचा - कोरोनाविरोधी लढ्यात भारताला मोठं यश! लशीनंतर औषधही तयार; चाचणीचा एक टप्पा यशस्वी
या औषधामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ज्या रुग्णांना औषध देण्यात आलं, त्यापैकी 91.15% रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी 7 दिवसांतच निगेटिव्ह आली, असं कंपनीने सांगतिलं आहे. औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंतही कमी होते. शिवाय रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्याचा कालावधीही कमी होतो, असं कंपनीनं सांगितलं.
हे वाचा - ऑक्सिजन कमतरतेच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका; या उपयांकडे विशेष लक्ष द्या
सध्या देशात कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येने 3 लाखांचा आकडा वार केला आहे. एकाच दिवसात 3,32,730 नवे रुग्ण आढळले आहेत. दैनंदिन नव्या रुग्णांची ही जगातील सर्वात मोठी संख्या आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा आता 1,62,63,695 झाला आहे. त्यापैकी 24 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus