Home /News /lifestyle /

World Stroke Day 2021 : 'BE FAST' स्ट्रोक येताच लक्षात ठेवा हा एक मंत्र; वाचेल अमूल्य जीव

World Stroke Day 2021 : 'BE FAST' स्ट्रोक येताच लक्षात ठेवा हा एक मंत्र; वाचेल अमूल्य जीव

World stroke day 2021 : स्ट्रोकसंबंधीच्या लक्षणांची ओळख लवकर पटल्यास आणि लवकर योग्य उपचार घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात.

मुंबई, 29 ऑक्टोबर : आज जागतिक ब्रेन स्ट्रोक डे (World Stroke Day) आहे. स्ट्रोकच्या (Stroke) उपचारांबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. बदलती जीवनशैली आणि तणावामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होत आहेत (Stroke symptoms). 30 ते 50 या वयोगटातल्या व्यक्ती ब्रेन स्ट्रोकला बळी पडत आहेत. स्ट्रोकमुळे जगभरात लाखो लोकांना मृत्यूचा सामना करावा लागतो. स्ट्रोकसंबंधीच्या लक्षणांची ओळख लवकर पटल्यास आणि लवकर योग्य उपचार घेतल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे स्ट्रोकची लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे. दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या (Sir Ganga Ram Hospital) कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट (Neurologist) डॉ. अनुराधा बत्रा (Dr Anuradha Batra) यांनी ब्रेन स्ट्रोकबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. डॉ. अनुराधा यांच्या मते, ब्रेन अटॅक (Brain Attack) म्हणजे स्ट्रोक (Stroke) येणं ही एक आपत्कालीन परिस्थिती आहे. यात मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित होतो, नाही तर मेंदूच्या आतली रक्तवाहिनी (blood vessel) फुटते. या दोन्ही परिस्थितींमध्ये पुरेसा ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोहोचत नाही. परिणामी तो भाग अकार्यक्षम होतो. मेंदूच्या त्या भागाचं शरीराच्या ज्या अवयवावर नियंत्रण असतं त्यांचं कार्य कमी होतं किंवा बंद पडतं. मेंदूतल्या पायाचं नियंत्रण असलेल्या मज्जातंतूला इजा झाली, तर अर्धांगवायू (Paralysis) होऊ शकतो. अलीकडे तरुण वयातही स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढलं आहे. यामागचं सर्वांत मोठं कारण म्हणजे उशिरा झोपणं, उशिरा उठणं, नियमित व्यायाम न करणं, वेळेवर न जेवणं, जंक फूड खाणं आणि वेगवेगळी व्यसनं असणं. तसंच वाढता ताणतणावसुद्धा हृदय आणि मनाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. हे वाचा - शरीरावर एक मॅजिक नंबर लिहिताच छुमंतर होते कोणतीही समस्या; तरुणाचा विचित्र उपाय रुग्णाला वेळेत म्हणजेच स्ट्रोक आल्याच्या 48 तासांच्या आत योग्य उपचार मिळाले तर जीव वाचवण्यास मदत होऊ शकते, असं डॉक्टर अनुराधा यांनी सांगितलं. यामुळेच स्ट्रोकची लक्षणं ओळखणं महत्त्वाचं आहे. स्ट्रोकसंबंधी लक्षणांची ओळख ‘BE FAST’ पद्धतीने करता येऊ शकते. B - संतुलन (Balance) - स्ट्रोक पीडित असलेल्या व्यक्तीच्या शरीराचं संतुलन बिघडतं. ती व्यक्ती नीट बसूही शकत नाही आणि उभी राहू शकत नाही. E - डोळे (Eyes)- स्ट्रोकचा त्रास होत असलेल्या व्यक्तीची नजर अंधूक होते. अचानक एका डोळ्याची किंवा दोन्ही डोळ्यांची दृष्टी अंधूक होते. असं होत असल्यास स्ट्रोकचा त्रास असू शकतो, असा अंदाज बांधावा. F - चेहरा (Face) - स्ट्रोक पीडित व्यक्तीचा चेहरा वाकडा होतो. यात रुग्ण हसू शकत नाही आणि चेहरा सरळही दिसत नाही. A - हात (Arms) - स्ट्रोकमध्ये हात ढिले पडतात आणि ते वर उचलता येत नाहीत. सामान्य भाषेत सांगायचं तर त्यांच्यात जीव राहत नाही. S - बोलणं (Speak)- स्ट्रोक पीडित व्यक्तीला बोलण्यात अडचण येते. जीभ अडखळते. T- वेळ (Time) - जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्ट्रोक येतो, तेव्हा लवकरात लवकर वेळ न वाया घालवता, रुग्णालय गाठणं गरजेचं असतं. उपचारासाठी एमआरआय, सीटी स्कॅन आणि उत्तम आयसीयू सुविधा असलेलं रुग्णालय निवडावं. 'गोल्डन अवर' स्ट्रोकची लक्षणं दिसल्यानंतर सीटी स्कॅन (CT Scan) आणि रक्त तपासणी केली जाते. तसंच डॉक्टर एमआरआय आणि मेंदूची अँजिओग्राफीदेखील (angiography) करतात. स्ट्रोकनंतरचा सुमारे साडेचार तासांचा कालावधी म्हणजे 'गोल्डन अवर' (Golden Hour) असतो. या वेळेत डॉक्टर रुग्णाला एक विशेष इंजेक्शन देतात. यामुळे रुग्णाची प्रकृती बऱ्यापैकी सुधारू शकते. याला 'क्लॉट बस्टर' (Clot Buster) असंही म्हणतात. हे वाचा - डोकेदुखी असो वा अंगदुखी, आता पेनकिलर घेणं सोडा; फक्त हे फळ खाऊन दूर होतील वेदना क्लॉट किती जुना हे जाणून घेण्यासाठी एमआरआय सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्या आधारे क्लॉट काढून टाकण्यासाठीची पुढील प्रक्रिया केली जाते. रुग्णाला स्ट्रोक आल्याच्या पहिल्या चार तासांमध्ये 'क्लॉट बस्टर' (Clot Buster) देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मात्र, त्यास उशीर झाल्यास सॉफ्टवेअरचा वापर करून उपचार सुरू केला जातो, असं डॉ अनुराधा यांनी सांगितलं. ही काळजी घ्यावी  उच्च रक्तदाबामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ब्रेन स्ट्रोकपासून वाचण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. कोलेस्टेरॉलची वाढती पातळी उच्च रक्तदाबाची शक्यता वाढवते. रक्तातली साखर नियंत्रणात ठेवावी. मधुमेह असलेल्यांनी खाण्या-पिण्याची पथ्यं पाळावीत आणि वेळेवर औषधं घ्यावीत. लठ्ठपणा टाळण्यासाठी नियमित व्यायाम करावा आणि पोषक आहार घ्यावा. हिरव्या भाज्या आणि फळं खावीत. कुटुंबातल्या कोणाला स्ट्रोकचा त्रास झाला असेल तर सर्वांनीच खबरदारी बाळगावी. वैद्यकीय सल्ला घ्यावा, घरीच उपाय करत बसू नये. मद्यपान, धूम्रपानासह इतरही चुकीच्या सवयींपासून दूर राहावं. स्ट्रोकवरचे उपचार अँजिओग्राफी : मेंदूच्या धमन्यांची अँजिओग्राफी केली जाते. याला इंटरव्हेंशनल न्यूरो रेडियोलॉजी (Interventional Neuro Radiology) असंही म्हटलं जाते. यात ब्लॉकेज किती आहेत आणि कुठे आहेत हे दिसतं आणि ब्लॉकेज काढण्याचे प्रयत्न केले जातात. अँजिओप्लास्टी : मेंदूत झालेल्या रक्ताच्या गुठळ्या आणि ब्लॉकेज अँजिओप्लास्टीमध्ये मॉडर्न स्टेंटच्या (Stent) माध्यमातून काढलं जातं; मात्र अँजिओप्लास्टीची गरज प्रत्येक व्यक्तीला पडते असं नाही. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीची अँजिओप्लास्टी केली जात नाही. ही उपलब्धता सगळीकडेच असेल असंही नाही. विशेष सॉफ्टवेअर (special software) : स्ट्रोकपीडित रुग्णाच्या मेंदूचं किती नुकसान झालं आहे आणि किती प्रमाणात आपण वाचवू शकतो, याची माहिती आधुनिक सुपर कॉम्प्युटरमधल्या एका खास सॉफ्टवेअरच्या मदतीने घेतली जाते. स्ट्रोकमध्ये प्रतिबंध गरजेचा आहे. त्यामुळे मेंदू वाचवला जाऊ शकतो. याचा फायदा रुग्णालयात उशीरा पोहचणाऱ्या रुग्णालाही होऊ शकतो. कारण, एमआरआयच्या डिफ्यूजन-परफ्यूजन-मिसमॅचद्वारे मेंदूची स्थिती कळते आणि उपचार लवकर करता येतात. फिजिओथेरपी (Physiotherapy) : स्ट्रोक आल्यानंतर रुग्णाच्या शरीरातले अवयव नीट काम करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी फिजिओथेरपीची मदत घेतली जाते. त्यांचे स्नायू आणि सांधे यांच्या मजबुतीसाठी नियमित व्यायाम करून घेतला जातो. तसंच त्यांना स्पीच थेरपीही दिली जाते. निरुपयोगी झालेल्या अवयवांना सक्रिय करण्यासाठी त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. स्ट्रोकचे प्रकार इस्केमिक स्ट्रोक (ischemic stroke) : इस्केमिक स्ट्रोक हा सर्वांत सामान्य स्ट्रोक आहे. मेंदूला रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी गुठळ्या झाल्यामुळे अरुंद होते किंवा ब्लॉक होते. मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या आत चरबी जमा झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या स्थितीत मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे मेंदूचं काम करणं बंद होतं. ट्रान्झिएन्ट इस्केमिक स्ट्रोक (transient ischemic stroke) : मेंदूला रक्तवाहिन्यांद्वारे योग्य प्रमाणात रक्तपुरवठा होऊ शकत नाही. त्याला ट्रान्झिएंट इस्केमिक स्ट्रोक (transient ischemic stroke) म्हणतात. अनेक लोकांना या स्ट्रोकची लक्षणं जाणवतात. मात्र, ही लक्षणं एक ते दोन दिवसांमध्ये नाहीशी होतात. हात-पाय कमजोर होणं, बोलताना अडखळणं, चेहरा वाकडा होणं आणि शरीराचं संतुलन बिघडणं, अशी लक्षणं दिसतात. या लक्षणांना ओळखणं फार महत्त्वाचं आहे. अशी लक्षणं दिसल्यास लवकरात लवकर न्यूरो तज्ज्ञाचा सल्ला घ्यायला हवा. हिमोरेजिक स्ट्रोक (Hemorrhagic stroke) : हेमोरेजिक स्ट्रोकला ब्रेन हॅमरेज (Brain Hemorrhage) असंही म्हटलं जातं. यात मेंदूतली रक्तवाहिनी फुटते. रक्तवाहिनी फुटून मेंदूत रक्तस्राव होतो. उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींना याचा धोका जास्त असतो. ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे.
First published:

Tags: Brain, Brain stroke, Disease symptoms, Health, Health Tips

पुढील बातम्या