बॅलग्रेड, 02 जुलै : गाय किंवा म्हशीच्या दुधापासून तयार केलेलं पनीर तर तुम्हाला माहिती आहे. मात्र गाढवाच्या दुधापासून चीझ (donkey milk cheese) तयार केल्याचं कधी ऐकलं आहे का? हो गाढवाच्या दुधापासूनही पनीर तयार केलं जातं आणि जगातील सर्वात महागडं चीझ आहे. फक्त एक किलो चीझसाठी जवळपास 78 रुपये मोजावे लागतात.
युरोपियन देश सर्बियातील एका फार्म हाऊसवर गाढवांच्या दुधापासून चीझ तयार केलं जातं. हे खूप दुर्मिळ चीझ आहे कारण हे भरपूर प्रमाणात तयार केलं जाऊ शकत नाही. हे चीझ तयार करण्यासाठी विशेष प्रजातीची गाढवं लागतात.या गाढविणींच्या दुधापासून तयार केलेलं चीझ चविष्टच नव्हे तर आरोग्यासाठीदेखील फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.
उत्तर सर्बियातील जैसाविका नावाचं एक फार्म हाऊस आहे. याचे मालक स्लोबोदान सिमिक यांनी 200 पेक्षा जास्त गाढवं पाळलीत. बाल्कन प्रजातीची ही गाढवं आहेत. जी सर्बिया आणि मांटेनेग्रो प्रांतात सापडतात. त्यांच्या दुधापासून विविध उत्पादनं तयार केली जातात.
गाढविणीच्या दुधात आईच्या दुधाप्रमाणेच गुण असतात. एका नवजात बाळाला जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच हे दूध देता येऊ शकतं. तसंच अस्थमा, ब्राँकायटिससारख्या आजारांवरही हे दूध फायदेशीर आहे, असा दावा सिमिक यांनी केला आहे. या दुधाबाबत अधिक संशोधन झालेलं नाही, त्यामुळे त्याच्या फायद्यांबाबत फारशी माहिती नाही. दरम्यान युनायटेड नेशनने ज्यांना गायीच्या दुधाची अॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी हे दूध पर्याय असू शकतं, असं सांगतिलं.
हे वाचा - आता काय म्हणावं याला! भाजीत सापडलेल्या अळ्याही त्याने पाळल्या
सिमिक यांच्या मते, त्यांच्याआधी जगात गाढविणीच्या दुधापासून चीझ कुणीच बनवलं नाही. जेव्हा त्यांनी या दुधापासून चीझ बनवण्याचा विचार केला तेव्हा एका समस्या होती ती म्हणजे या दुधात कॅसीनचं स्तर कमी असतं, जे पनीरसाठी बाइंडिंग एजेंटचं काम करतं. सिमिक यांना जैसाविकाच्या एका सदस्याने मार्ग काढून दिला. गाढवाच्या दुधात काही प्रमाणात बकरीचं दूध मिसळलं तर त्यापासून चीझ बनवता येऊ शकतं, हे त्याने सांगितलं.
वर्ल्ड रिकॉर्ड अकॅडमीनेदेखील याबाबत माहिती दिली आहे. शिवाय बीबीसीमध्येही याबाबत लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
एक गाय दिवसाला 40 लीटर दूध देऊ शकते. मात्र एक गाढवीण दिवसाला एक लीटरही दूध देत नाही. त्यामुळेच या चीझचं उत्पादन खूप कमी होतं. एका वर्षात या फार्म हाऊसमध्ये वर्षाला फक्त 6 ते 15 किलो चीझ बनतं आणि विकलं जातं आणि उत्पादन कमी असल्याने त्याची किंमतही जास्त आहे. विदेशी नागरिक आणि पर्यटकांकडून या चीझला मागणी असते.
हे वाचा - इथं लपलाय भला मोठा अजगर; आधी तुम्ही शोधा मग इतरांनाही चॅलेंज द्या
आता शेतीमध्ये यंत्राचा वापर होत असल्याने सर्बियात आता या गाढवांचा उपयोग होत नाही. मात्र सिमिक आपल्या फार्ममध्ये या गाढवांचं संरक्षण करतात. सिमिक सांगतात आपल्या उत्पादनानंतर आता या गाढवांची मागणीही वाढली आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड