मुंबई, 6 फेब्रुवारी : वैवाहिक जीवनात पती आणि पत्नीमध्ये सुसंवाद, सामंजस्य, प्रेम या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यामुळे नातं अधिक सुदृढ होतं. काही वेळा वैवाहिक जीवनात किंवा लव्ह लाइफमध्ये काही कारणांमुळे विसंवाद निर्माण होतो. महिलांचा वारंवार मूड बदलणं हे यामागचं एक कारण असतं. सातत्याने मूड बदलणं, चिडचिडेपणा आणि निराश राहण्याची वृत्ती नात्यात अडचणी निर्माण करते. पत्नीचा किंवा गर्लफ्रेंडचा मूड चांगला राहावा यासाठी शॉपिंग, खर्च करणं, लांब फिरायला जाणं या गोष्टी करण्यावर भर दिला जातो; पण या गोष्टी करूनही फारसा पडत नाही.
मूड सातत्याने बदलण्यामागे मूड स्विंग ही समस्या असते. अर्थात या समस्येला हॉर्मोन्स कारणीभूत असतात. महिलांच्या शरीरातली हॉर्मोन्स काही कारणांनी असंतुलित झाली, तर त्याचा परिणाम वर्तणुकीवर दिसून येतो. ही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी काही गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे. याबाबतच्या टिप्स जाणून घेऊ या. `एबीपी लाइव्ह`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
कमी वयात मासिक पाळी बंद करण्याकडे वाढतोय मुलींचा कल! पाहा कोणती आहे ही ट्रीटमेंट
महिलांमध्ये हॉर्मोन्स असंतुलित झाली, की त्याचा परिणाम वर्तवणुकीवर होत असल्याचं दिसून येतं. यामुळे मूड स्विंग होण्याची समस्या जाणवते. मूड स्विंग्जदरम्यान चिडचिडेपणा जास्त जाणवतो. कारण नसताना आनंद होणं किंवा विनाकारण संतापणं ही दोन्ही लक्षणं मूड स्विंग्जशी संबंधित आहेत. जेव्हा तुमचा जोडीदार किरकोळ गोष्टींवरून विनाकारण चिडू लागतो किंवा छोट्या गोष्टींवरही तीव्र प्रतिक्रिया देऊ लागतो, तेव्हा ही मूड स्विंग्जची लक्षणं समजावीत.
महिलांमध्ये मूड स्विंग्ज मासिक पाळीपूर्वीच्या लक्षणांशी संबंधित असतात; पण हा त्रास या एका गोष्टीपुरता मर्यादित नाही. या त्रासाचा थेट संबंध पोषक आहाराच्या कमतरतेशीदेखील आहे. महिलांनी रोजच्या आहारात हॅपी हॉर्मोन्स वाढवणारे पदार्थ समाविष्ट केले नाहीत, तर मूड स्विंग्जची समस्या जास्त प्रमाणात भेडसावते. त्यामुळे महिलांमध्ये विनाकारण चिडचिड, निराशा ही लक्षणं दिसतात.
रोजच्या आहारात हॅपी हॉर्मोन्सचं सिक्रिशन वाढवणारे काही पदार्थ समाविष्ट केले तर मूड स्विंग्जची समस्या दूर होऊ शकते. मूड चांगला राहावा आणि हॉर्मोन्स संतुलित राहण्यासाठी महिलांनी आहारात अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ समाविष्ट करावेत. रोजच्या आहारात ब्लूबेरी, मलबेरी, आवळा, बोरं, द्राक्ष, किसमिस, मनुका यांसारखे पदार्थ समाविष्ट करावेत. मूड बूस्ट व्हावा यासाठी महिलांच्या आहारात इडली, डोसा, ढोकळा, आवळ्याचे पदार्थ, किमची, दही यांसारखे आंबट आणि प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ असावेत.
याशिवाय प्रोटीन्समधली अमिनो अॅसिड्स न्यूरोट्रान्समीटर्सप्रमाणे काम करतात. न्यूरोट्रान्समीटर्स हे शरीरातल्या अवयवांमध्ये समन्वय आणि व्यवस्थापनाचं काम करतात. याशिवाय ते मूड चांगला राहण्यासाठीदेखील उपयुक्त ठरतात. पालक भाजीत आयर्न, मॅग्नेशियम आणि फिनेथेलेमीन असते. हे तिन्ही घटक शरीरात अँटीडिप्रेसंटच्या औषधाप्रमाणे काम करतात. यामुळे चिडचिड आणि निराशा येत नाही. आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास महिलांमधली मूड स्विंग्जची समस्या नक्कीच कमी होऊ शकते आणि साहजिकच याचा सकारात्मक परिणाम नातेसंबंधात दिसून येऊ शकतो.
या 3 गोष्टींनी बनवा DIY लीप टिंट, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक आणि त्वचाही राहील सुरक्षित
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Mental health