Home /News /lifestyle /

PCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा

PCOS ची समस्या असली तरी होऊ शकता प्रेग्ननंट; काय आहे उपाय वाचा

गर्भधारणा होत नाही अशा प्रत्येक तिसऱ्या महिलेला पीसीओएसची (pcos) समस्या असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

    मुंबई, 29 सप्टेंबर : गेल्या काही वर्षांत पॉलिसिस्टिक ओव्हरिज सिंड्रोम (PCOS) असलेल्या महिलांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गर्भधारणा (Pregnant) होत नाही अशा प्रत्येक तिसऱ्या महिलेला पीसीओएसची समस्या असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 18 ते 35 वयोगटातील 20 ते 30 टक्के महिला पीसीओएससारख्या आजाराने ग्रस्त असल्याचं दिसून आलं आहे. पीसीओएसग्रस्त स्त्रियांना पुढील आयुष्यात वंध्यत्व, हायपरलिडिमिया, हृदयविकार तसंच हायपरटेन्शन हे विकार होण्याचा धोका अधिक असतो. पीसीओएसने ग्रासलेल्या स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचा दर जास्त असतो. कारण त्यामुळे अनियमित ओव्ह्युलेशन होतं किंवा ओव्ह्युलेशन होत नाही. अशा वेळी वैद्यकीय मदतीशिवाय गर्भधारणा होणे  कठीण असतं. मुंबईच्या नोव्हा आयव्हीएफ फर्टीलिटीच्या फर्टीलिटी कन्सलटंट डॉ. रितू हिंदुजा यांनी सांगितलं, नुकतंच एक तिशी पार जोडपं मूल होत नसल्याची तक्रार घेऊन उपचारासाठी आलं होतं. तीन वर्ष प्रयत्न करूनही त्यांना मूल होत नव्हतं. चाचणीनंतर त्या महिलेला पीसीओएस असल्याचं निदन झालं आणि त्यामुळेच तिला नैसर्गिक गर्भधारणा होत नव्हती. त्यानंतर इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) उपचार पद्धतीने या महिलेची गर्भधारणा झाली.  पीसीओएस सारख्या समस्येमुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा न होऊ शकणाऱ्या महिलांसाठी आयव्हीएफ ही उपचार पद्धत योग्य ठरते. हे वाचा - बेबी बंपवर मेंदी! प्रेग्नंट तरुणींचे हे PHOTO पाहून तुम्हीदेखील व्हाल अवाक पीसीओएस असलेल्या ज्या स्त्रियांना गर्भधारणा झालेली असते अशा स्त्रियांवर गर्भारपणात खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवलं पाहिजे. कारण ह्या स्त्रियांना तीन पट जास्त गर्भपाताचा धोका असतो. गर्भारपणातील मधुमेह आणि अकाली प्रसूती हे पीसीओएसचे आणखी काही दुष्परिणाम आहेत जे गर्भारपणात आढळू शकतात. गर्भारपणात मेटफोर्मीन घेण्याचा सल्ला डॉक्टर घेऊ शकतात त्यामुळे गर्भपाताची शक्यता कमी होते. पीसीओएस असलेल्या गर्भवती महिलेनं नियमित व्यायाम करण्याची गरज असते. हलके व्यायाम केल्याने इन्सुलिनचा वापर शरीर करू लागते, त्यामुळे संप्रेरकांचे संतुलन होतं आणि वजन नियंत्रित राहतं. पीसीओएस असलेल्या गर्भवती स्त्रीचा आहारसुद्धा महत्त्वाचा आहे. प्रथिनं आणि तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात घेल्यास गर्भारपणात इन्सुलिनची पातळी नियंत्रित राहते. हे वाचा - सकाळी उठल्यानंतर तुमच्याही पाठीत कळ येते का? दुर्लक्ष केल्यास येऊ शकतं अपंगत्व पीसीओएस ही आयुष्यभर राहणारी अशी समस्या आहे. मात्र ही समस्या उद्भवू नये यासाठी योग्य जीवनशैली, संतुलित आहार, शारीरिक हालचाली आणि वजन नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे, असं पुण्यातील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीतील फर्टीलिटी कन्सलटंट डॉ. भारती ढोरे-पाटील यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Pregnant, Pregnant woman, Woman

    पुढील बातम्या