चंदीगढ, 18 नोव्हेंबर : दैनंदिन आयुष्यात आपण बऱ्याच चुका नकळत करत असतो. किंबहुना या चुका आपल्या सवयीचा भाग झालेल्या असतात. अशीच एक चुकीची सवय एका महिलेच्या जीवावर बेतली. अंघोळ करताना तिने असं काही केलं की बाथरूममध्येच तिचा जीव गेला आहे. खरंतर या महिलेने ची चूक केली ती तुमच्यापैकी बरेच लोक करत असतील. त्यामुळे आज ही महिला उद्या याजागी तुम्हीही असू शकता. त्यामुळे ही घटना काय आहे, ते वाचून सावध व्हा.
फरीदाबादमधील 33 वर्षांची ही महिला. रूचा शाह असं तिचं नाव. एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जनरल मॅनेजर असलेली रूचा प्रेग्नंट होती. आपल्या कुटुंबासोबतच ती राहत होती. बुधवारी संध्याकाळी घरी आल्यानंतर ती अंघोळीला गेली. बराच वेळ बाहेर आली नाही. कुटुंबातील सदस्यांनी तिला हाका मारल्या. पण तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अखेर शेजाऱ्यांना बोलावून कुटुंबाने बाथरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा ती बाथरूममध्ये बेशुद्ध पडली होती. तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिला वाचवता आलं नाही. तिचा मृत्यू झाला होता.
हे वाचा - बापरे! दातात झालं असं खतरनाक इन्फेक्शन की जीवही गेला; 15 वर्षीय मुलीचा मृत्यू
पोस्टमॉर्टेम रिपोर्टच्या तिचा मृत्यू श्वास कोंडल्याने झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी सांगितलं की, बाथरूममध्ये गॅस गिझर होतं आणि कुठेच वेंटिलेशन नव्हतं. त्यामुळे गिझरचा गॅस बाथरूममध्ये कोंडला आणि रुचा बेशुद्ध झाली. तिला ऑक्सिजन मिळाला नाही आणि तिचा मृत्यू झाला.
गॅस गिझरमध्ये एलपीजीचा वापर होतो. गिझरमुळे कार्बन मोनोऑक्साइड आणि नाइट्रो ऑक्साइड असे हानिकारक गॅस बनतात. या गॅसचं प्रमाण बाथरूममध्ये वाढल्यास लोक बेशुद्ध होतात. जास्त वेळ गिझर चालू राहिल्यास बंद बाथरूममध्ये श्वास कोंडतो आणि काही वेळात मृत्यू होतो. लवकरात लवकर उपचार मिळाले तरच जीव वाचवता येतो, असं डॉक्टरांनी सांगितलं.
हे वाचा - बाप रे बाप! व्यक्तीच्या पोटातून निघाला चक्क 'फुटबॉल'; वेदनेकडे दुर्लक्ष करणं पडलं महागात
बऱ्याच लोकांच्या घरात गिझर आहे. आता हिवाळ्यात गरम पाण्यासाठी तर याचा वापर होतोच. त्यामुळे गिझर वापरताना रूचाने जी चूक केली ती तुम्ही करू नका. तिच्यासारखी मृत्यूची वेळ तुमच्यावर येऊ नये म्हणून सावध व्हा. गिझर वापरताना आवश्यक ती काळजी घ्या.
गॅस गिझर वापरताना काय काळजी घ्यायची
गॅस गिझर आणि सिलेंडेर दोन्ही बाथरूमच्या बाहेरच असावे. पाणी पाइपने बाथरूममच्या आत घेता येऊ शकतं.
बाथरूममचा दरवाजा बंद कऱण्याआधी बादलीत गरम पाणी भरून घ्या.
गिझर बंद केल्यानंतरच अंघोळ करा.
बाथरूममध्ये क्रॉस व्हेंटेलिशन असेल याची खबरदारी घ्या.
एक जण अंघोळ करून आल्यानंतर लगेच बाथरूममध्ये जाऊ नका, काही वेळ दरवाजा उघडा राहू द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle