मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

एखादी व्यक्ती सतत उशिरा का येते? यामागेही दडलं आश्चर्यचकित करणारं विज्ञान; वाचून व्हाल थक्क

एखादी व्यक्ती सतत उशिरा का येते? यामागेही दडलं आश्चर्यचकित करणारं विज्ञान; वाचून व्हाल थक्क

लोकं उशिरा येण्यामागची वैज्ञानिक कारणं

लोकं उशिरा येण्यामागची वैज्ञानिक कारणं

काही ठरावीक प्रकारचं व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती अन्य व्यक्तींपेक्षा नेहमी उशिरा येतात हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

मुंबई, 02 डिसेंबर:  ‘वेळ अत्यंत मौल्यवान असतो,’ (Time Is Money) असं अगदी लहानपणापासूनच आपण ऐकत असतो. आपल्यापैकी बहुतेक जण वेळेची किंमत जाणतात; पण तरीही काही जण मात्र नेहमीच उशिरा येतात. वेळ पाळणं त्यांना कधीच जमत नाही. त्यांना वेळेचं महत्त्व नक्कीच माहिती असतं. तरीही त्यांना नेहमीच उशीर होतो. याचबद्दल ‘Metro.co.uk’ या वेबसाइटवर अधिक माहिती देण्यात आली आहे.

वेळ न पाळणं याकडे नकारात्मक गोष्ट म्हणूनच बघितलं जातं. कामाच्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणीही जे वेळ पाळतात त्यांना अशा उशिरा येणाऱ्यांचा प्रचंड राग येतो. वेळ न पाळणाऱ्यांबद्दल नेहमीच संताप व्यक्त होतो. अशा वेळ न पाळणाऱ्या व्यक्तींशी अनेकांचे संबंधही बिघडतात. त्यामुळेच जे वेळ पाळत नाहीत त्यांना मॅनर्स नाहीत असं म्हटलं जातं किंवा त्यांना इतरांच्या वेळेपेक्षा स्वत:च्या वेळेची जास्त किंमत आहे, अशी टीका केली जाते; मात्र दर वेळेस हेच खरं असेल असं नाही.

‘मला लोकांची किंवा त्यांच्या भावनांची पर्वा नाही असं जाणीवपूर्वक कोणी व्यक्ती फारसं वागत नाही,’ असं सायकोथरपिस्ट सोमिया झमान यांचं म्हणणं आहे. यासाठी विविध मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. काही ठरावीक प्रकारचं व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ती अन्य व्यक्तींपेक्षा नेहमी उशिरा येतात हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

‘काही जण आशावादी असतात आणि आपण आपल्या अत्यंत व्यग्रतेमधूनही आपण प्रत्येक गोष्ट मॅनेज करू शकतो असा त्यांना विश्वास असतो. आम्ही त्यांना ओव्हर शेड्युलर्स असं म्हणतो,’ असं सोमिया यांनी स्पष्ट केलं. ‘मात्र जर रोजच एकाच वेळेस भरपूर कामं करण्याचा त्यांचा स्वभाव असेल तर मात्र ते नेहमीच कशासाठी तरी उशिरा जात असणार हे नक्की,’ असंही त्या म्हणाल्या. अशा आशावादी व्यक्ती, बडबड करणाऱ्या व्यक्ती एकत्र गटात असतील तर मात्र त्यांच्या मीटिंग, अपॉइंटमेंट्स, जेवायला जाणं, अशा सगळ्या गोष्टींना ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ लागतो. साहजिकच त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी उशीर होतो.

अर्थात काही वेळा अशा व्यक्ती इतरांना वाईट वाटेल किंवा त्यांच्या भावना दुखावतील म्हणून शक्य असतानाही नाही म्हणू शकत नाहीत. किंवा एखादी महत्त्वाची संधी हातून जाईल, अशी भीतीही त्यांना वाटत असते.

काही व्यक्ती हे विलंब करणाऱ्या असतात. म्हणजेच अशा व्यक्ती स्वत: आधी दुसऱ्या कोणत्या तरी कामात अडकलेल्या असतात. त्यामुळे त्यांना जिथे वेळेवर जायचं आहे किंवा जे काम वेळेवर करायचं आहे ते कधीच होत नाही. अर्थातच अशा व्यक्तींना कायम कोणती तरी चिंता भेडसावत असते. त्यामुळे त्यांना कधीकधी एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी जायलाही कठीण वाटतं.

पृथ्वीवर पाणी आलं कुठून? जपानमध्ये झालेल्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर!

‘आपण सगळेच जण आपल्या आतल्या आणि बाहेरच्या अपेक्षांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतो. हा प्रतिसाद जाणीवपूर्वक नसतो. एखादा विशिष्ट स्वभाव किंवा वैशिष्ट्य याला प्रतिसाद देण्याची ती वृत्ती असते,’ असं Mind Your Business मध्ये सायकोथेरपिस्ट असललेल्या गेराल्डाईन जोआकिम यांचं म्हणणं आहे. काही व्क्ती त्यांच्या आतल्या अपेक्षा या बाहेरच्या अपेक्षांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने पूर्ण करतात. या बाहेरच्या अपेक्षा समाज, कामाचं ठिकाण आणि अन्य व्यक्तींकडून त्यांच्यावर लादलेल्या असतात. ठरावीक ठिकाणी ठरावीक वेळेला भेटणं ही बाहेरची अपेक्षा आहे. आपण ज्यांना भेटणार आहोत त्यांच्याकडून ती लादलेली असते, असं त्यांचं म्हणणं आहे. या बाहेरच्या अपेक्षांवर ज्या व्यक्ती भर देतात, त्या अधिक वेळ पाळणाऱ्या असतात. याचं कारण ते बाहेरच्या जबाबदारीला अधिक महत्त्व देतात. स्वत:च्या मनातल्या अपेक्षा पूर्ण करायला जे प्राधान्य देतात ते वेळ न पाळणाऱ्या गटातले असतात. अर्थात हा उद्धटपणा नाही. अशा व्यक्ती अनेकदा वेळेवर जाण्याचा प्रयत्न करतात; पण त्या नेहमीच त्यात यशस्वी होतात असं नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे.

या सगळ्याचा संबंध आपल्या लहानपणाशी आहे. आपण काय शिकलो, कसं वाढलो यावर हे बरंच काही अवलंबून आहे.अनेक गोष्टींमध्ये आपण आपल्या पालकांसारखंच वागायचा प्रयत्न करतो किंवा अगदी विरुद्ध वागायचा प्रयत्न करतो. ‘वेळ पाळणाऱ्या व्यक्तींचे पालक नोकरी किंवा बाहेर काम करणारे असतात. त्यामुळे त्यांचं ठरावीक वेळापत्रक असत. साहजिकच मुलांनाही तशीच सवय लागते,’ असं The One Moment Company तील वेळ व्यवस्थापन तज्ज्ञ कॅर्मेल मूरे यांचं म्हणणं आहे.

याविरुद्धही घडू शकतं. पालक मुलाला शाळेत सोडायला किंवा घ्यायला नेहमी उशिरा जात असतील तर त्यामुळे त्यांना लाज वाटते आणि त्यामुळेच अशी मुलं मोठी होऊन काम करू लागतात तेव्हा वेळेच्या बाबतीत जरा जास्तच काटेकोर बनतात. तसंच काही धार्मिक प्रार्थना किंवा प्रथा-परंपरा यामुळेही वेळ पाळण्याच्या बाबतीत एक सवय लागते, असंही त्या सांगतात.

एखादी व्यक्ती जास्तच तणावात असेल, तर पुढे असलेली कामं पर्वताएवढी मोठी वाटतात. तो डोंगर चढून जाणं अशक्य वाटतं, असं Vita Health Group च्या सायकॉलॉजिकल वेलबीइंग फॅसिलिटेटर ल्युसी आयर्नमॅन यांना वाटतं. या तणावाचा परिणाम टाळण्यात होतो आणि त्यामुळे तणाव जास्त वाढतो. एखाद्या माणसाचं मानसिक आरोग्य नीट नसेल तर त्याचा दैनंदिन जीवनावरही परिणाम होतो.

आपल्या संमिश्र भावनांचा वेळेचं व्यवस्थापन करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. सकाळी लवकर उठून तयार हऊन बस पकडणं किंवा स्वयंपाक करणं अशा छोट्या छोट्या गोष्टींवरही याचा परिणाम होतो. दुसरं म्हणजे आपला मेंदू सतत एकाच पद्धतीनं काम करत नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे. न्यूरोडायव्हर्स व्यक्ती म्हणजेच गतिमंद व्यक्तींनाही वेळ व्यवस्थापन हे आव्हान वाटतं असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अनेकदा अशा व्यक्तींना स्वत:च्या काही काही गोष्टी करण्यातच झगडावं लागतं. त्यामुळे कारण जाणून न घेता, वेळ न पाळणाऱ्याबद्दल नेहमीच नकारात्मक भावना ठेवू नये.

दुसऱ्या बाजूला, उशिरा येणं त्या व्यक्तीच्या भावनांशीही निगडित आहे. त्याचा मानसिक आरोग्याशीही संबंध आहे. या गोष्टीचा आपल्या आयुष्यातल्या सर्वच गोष्टींवर प्रभाव पडतो आणि आपली लवकर किंवा उशिरा येण्याची प्रवृत्तीही त्याला अपवाद नाही.

तुम्हाला ठरवलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी, मीटिंगसाठी उशीर होत असेल आणि त्याबद्दल तुम्हाला अजिबात पश्चाताप होत नसेल किंवा तुम्हाला इतरांच्या वेळेशी काहीही देणंघेणं नसेल तर नक्कीच चांगली गोष्ट नाही. तुम्ही अगदी सगळीकडे वेळेवरच जात असाल तर तुमच्या जवळच्या उशिरा येणाऱ्या व्यक्तींना त्यामुळे त्रासही होत असेल, अशा दोन्ही बाजू असू शकतात.

वेस्टर्न डिस्टर्बन्स काय आहे? देशातील मुसळधार पाऊस आणि थंडीमागे हे आहे कारण?

तुमचा जोडीदार किंवा मित्र, कुटुंबातला सदस्य किंवा सहकारी लेटकमर किंवा नेहमी उशिरा येणारा असेल असेल तर साहजिकच त्याचा त्रास होतो; पण वेळ न पाळण्यामागची कारणंही किचकट असू शकतात हे लक्षात ठेवा. काही जणांना वेळ न पाळणं हे उद्धटपणाचं किंवा त्यांच्याकडे लक्ष न देण्याचं चिन्ह वाटतं; पण ते चुकीचं आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक किंवा हेतुपुरस्सर तुमच्या वेळेची किंमत करणार नाही असं होणार नाही. त्यामुळे तसा विचार करू नका. एखाद्याला उशीर होत असेल तर तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न बनू देऊ नका. असं केल्यानं तुमचाच ताण हलका होईल. तसंच अशा परिस्थितीला रागाने, चिडून तोंड देण्यापेक्षा शांतपणे विचारपूर्वक तोंड द्या. त्यामुळे उशिरा येणाऱ्याचाही ताण हलका होऊ शकेल.

त्यांना 'काही मदतीची गरज आहे का,' असं सौम्य शब्दांत विचारा. त्यांना 'काही ताणतणाव, काळजी आहे का, त्रास होतो आहे का' हे विचारा. कदाचित ते वेळेवर येण्यासाठी प्रयत्न करत असतील आणि त्यांना जमत नसेल तर तुमच्या या गोष्टींनी त्यांना मदत होईल. त्यामुळे वेळ न पाळणारे उशिरा का येत आहेत, याचा विचार करा. आणि तुम्ही नेमक्या कोणत्या गटात येता याचाही विचार करा.

First published:

Tags: Lifestyle, Science