**मुंबई 12 ऑक्टोबर :**आपण आपल्या आजूबाजूला बघतो की, काही व्यक्तींना एकदम क्रिएटिव्ह आयडिया सुचत असतात तर काहींना त्यासाठी डोक्याला थोडाफार ताण द्यावा लागतो. म्हणजेच काही व्यक्तींना क्रिएटिव्ह गोष्टी करण्यासाठी फार विचार करावा लागतो. बहुतेक लोकांचं म्हणणं आहे की, त्यांना बाथरूममध्ये सर्वांत जास्त क्रिएटिव्ह आयडिया सुचतात. तुमच्यापैकीसुद्धा काहींचा या गोष्टीला दुजोरा असेल. पण, असं का होतं हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. बाथरूममध्ये सर्वांत जास्त क्रिएटिव्ह आयडिया का येतात? याबाबत अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. बाथरूममध्ये असताना व्यक्तीच्या मेंदूत नेमके काय बदल होतात, हे शोधण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आता अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी या प्रश्नाचं उत्तर शोधून काढलं आहे. त्यांनी त्यांच्या रिसर्चमधील निर्ष्कांच्याआधारे हे सिद्ध केलं आहे की, बाथरूममध्ये असताना व्यक्तीच्या डोक्यात जास्त क्रिएटिव्ह विचार कसे काय येतात. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीतील संशोधक जॅक इरविंग यांनी याबाबत संशाधन केलं आहे. ते म्हणतात, “क्रिएटिव्ह आणि पूर्णपणे भिन्न प्रकारच्या विचारांसाठी एकाग्रता खूप महत्त्वाची असते. परंतु, एखाद्या विषयावर मेंदूचा जास्त वापर केल्यानं म्हणजेच जास्त विचार केल्यास चुकीचे परिणामदेखील मिळतात. त्यामुळे एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन आणि चांगला विचार करण्यासाठी मेंदूला ब्रेक आवश्यक असतो. क्रिएटिव्ह आयडिया तयार होण्यासाठी आवश्यक असलेली ही सामान्य अट आहे.” जेव्हा एखादी व्यक्ती बाथरूममध्ये असते तेव्हा या अटीची सहज पूर्तता होते. हेही वाचा - Excercise during Period : मासिक पाळीच्या प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम; त्या दिवसात करा ‘हा’ व्यायाम इरविंग सांगतात, बाथरूममध्ये आंघोळ करताना किंवा इतर कामं करताना मन पूर्णपणे शांत होतं. शांत मन असलेल्या स्थितीमध्ये व्यक्ती जास्त कष्ट न घेता सहज विचार करते. बाथरूममध्ये व्यक्ती एखाद्या गोष्टीचा चोहोबाजूंनी विचार करू शकते. परिणामी, त्या ठिकाणी जास्त क्रिएटिव्ह आयडिया मेंदूत येतात किंवा एखाद्या प्रॉब्लेमचं लवकर सोल्युशन सापडतं. पुढे ते असंही म्हणाले, “जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय विचार करते तेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात.” इरविंग यांनी केलेल्या संशोधनापूर्वी याबाबत अनेकदा संशोधन झालं आहे. काही शास्त्रज्ञांनी ‘शॉवर इफेक्ट’ला बाथरूममधील क्रिएटिव्हिटीचं श्रेय दिलं होतं. या इफेक्टनुसार, जेव्हा उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात कोमट पाणी डोक्यावर पडतं तेव्हा मेंदूत जास्त आयडिया येतात. मात्र, इरविंग यांचं संशोधन याच्या उलट आहे. बाथरूममध्ये असताना व्यक्तीच्या मेंदूत जास्त क्रिएटिव्ह विचार का येतात? याबाबत आणखी एक रिसर्च झाला होता. 2015 मध्ये या रिसर्चचे निष्कर्ष समोर आले होते. त्या निष्कर्षांनुसार, जर एखाद्या व्यक्तीनं जाणीवपूर्वक विचार करण्याचा प्रयत्न केला तर क्रिएटिव्ह आयडिया येत नाहीत. मनात एकाचवेळी अनेक गोष्टी सुरू असतील तर त्या काळात आलेले विचार फारसे परिणामकारक नसतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.