नवी दिल्ली, 12 एप्रिल: हनुमानाच्या जन्मस्थळावरून (Lord Hanuman Birth Place) कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये वादंग निर्माण झाला आहे. दोन्ही राज्यांनी हनुमानाचा जन्म आपल्या राज्यात झाल्याचा दावा केला आहे. कर्नाटकमधल्या शिवमोगा जिल्ह्यातील एका धार्मिक नेत्याने दावा केला आहे की भगवान हनुमानांचा जन्म कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील गोकर्णामध्ये (Gokarna) झाला होता. या आधीही कर्नाटकनेच हनुमानाचा जन्म कोप्पल जिल्ह्यातील किष्किंधा इथल्या अंजनेरी पर्वतावर झाल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे आंध्र प्रदेशचा दावा आहे की हनुमानाची जन्मभूमी तिरुपतीच्या सात पर्वतांपैकी एक अंजनाद्री (Anjanadri) आहे.
कर्नाटकच्या शिवमोगातील रामचंद्रपुर मठाचे प्रमुख राघवेश्वरभारती यांनी त्यांच्या दाव्यात रामायणाचा उल्लेख केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रामायणमध्ये भगवान हनुमान यांनी आपला जन्म गोकर्णमध्ये झाल्याचं सीतामाईला सांगितलं होतं. राघवेश्वर भारती म्हणाले, 'रामायणाशी संबंधित आढळलेल्या पुराव्यांनुसार गोकर्ण हनुमानाची जन्मभूमी असल्याचं स्पष्ट होते. तर किष्किंधेतील अंजनाद्री ही हनुमानाची कर्मभूमी होती.'
हे वाचा - रखवालदार ते IIM मध्ये प्रोफेसर; वाचा रणजीत आर यांची प्रेरणादायी कथा
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील हा वाद सोडवण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानकडून (TTD) तज्ज्ञ समिती नेमण्यात आली आहे. ही समिती 21 एप्रिल रोजी अहवाल सादर करेल. या समितीमध्ये वैदिक साहित्याचे जाणकार, पुरातत्व विभागातील वैज्ञानिक आणि इस्रोतील एका वैज्ञानिकाचा समावेश आहे. हा वाद सुरू असतानाच TTD मंदिर व्यवस्थापनाकडून 13 एप्रिलला म्हणजेच तेलुगू नवीन वर्षाच्या दिवशी एक पुस्तिका प्रसिद्ध केली जाणार आहे. या पुस्तिकेच्या माध्यमातून तिरुमालाच्या सात पर्वतांपैकी एक अंजनाद्री पर्वताला भगवान हनुमानाचे जन्मस्थळ आहे, हे सिद्ध होईल.
टीटीडी ट्रस्ट बोर्डचे कार्यकारी अधिकारी के. एस. जवाहर रेड्डी म्हणतात, की त्यांच्याजवळ पौराणिक आणि पुरातत्वाधारित पुरावे आहेत. यांच्या आधारे तिरुपतीच्या अंजनाद्री पर्वतावरच भगवान हनुमानाचा जन्म झाला होता,हे सिद्ध होईल.
हे वाचा - पोलिसांनी दाखवली माणुसकी, पायाला गोळी लागलेल्या माओवाद्याला रुग्णालयात केले दाखल
कर्नाटकमध्ये किष्किंधा येथील अंजनाद्रीमध्ये एका प्रकल्पावर काम सुरू केलं आहे. हनुमानाचा जन्म याच ठिकाणी झाला होता, याबद्दल माहिती देणं हे या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे. रामायणमध्ये हम्पीजवळ असलेल्या किष्किंधाया ठिकाणाचा उल्लेख आहे. रामायण सांगण्यात आल्यानुसार याच ठिकाणी भगवान राम आणि लक्ष्मण पहिल्यांदा हनुमानाला भेटले होते. 'आम्ही या जागेला भगवान हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून तीर्थस्थळाच्या रुपात विकसित करणार आहोत,' असं कर्नाटकचे मंत्री बी.सी. पाटील यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Andhra pradesh, Hanuman mandir, India, Karnataka