नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर : गर्भधारणा होणं ही गोष्ट अतिशय गुंतागुंतीची आहे. अनेक स्त्रियांना गर्भधारणेसाठी योग्य काळ कोणता याची माहिती नसते. गर्भधारणा होण्यासाठी आधी स्त्रीबीज व पुरुषबीजांचं कार्य कसं होतं हे समजून घ्यावं लागेल. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या चक्रावर हे गणित अवलंबून असतं. त्यानुसार ओव्ह्युलेशन कधी होतं हे समजतं. ते समजण्यासाठी पारंपरिक पद्धतींप्रमाणेच आणखीही काही गोष्टी उपयोगी ठरतात. त्याबाबत ‘प्रोगायनी डॉट कॉम’नं सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. स्त्रियांच्या मासिक चक्रामधील ओव्ह्युलेशनचा काळ हा प्रजननाचा काळ समजला जातो. अंडाशयातून परिपक्व बीजांडं बाहेर पडण्याच्या क्रियेला ओव्ह्युलेशन म्हणतात. प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. त्यामुळे हा कालावधीही प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळा असतो. ज्यांचं मासिक पाळीचं चक्र 28 दिवसांचं असतं, त्यांच्यामध्ये ओव्ह्युलेशन 13-15 या दिवसांमध्ये होतं. परिपक्व बीजांड बाहेर आल्यानंतर प्रजननक्रिया यशस्वी होण्यासाठी बीजांडाकडे 12 ते 24 तास असतात. त्यानंतर ते बीजांड नष्ट होतं; त्यामुळे त्याआधी शुक्राणूचा त्याच्याशी संयोग व्हावा लागतो. शुक्राणू स्त्रीच्या शरीरात 3 ते 5 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. त्यामुळे ओव्ह्युलेशनदरम्यानच्या 5 ते 7 दिवसांमध्येही स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकते. मातृत्व प्राप्त होण्याच्या दृष्टीनं लैंगिक संबंध अतिशय महत्त्वाचे आहेत; मात्र त्याबाबत अनेक गैरसमज असल्यानं गर्भधारणेत समस्या येतात. मातृत्व प्राप्त होण्याच्या दृष्टीने लैंगिक संबंध कधी ठेवावेत व कधी ठेवू नयेत, याबाबत अनेकांना माहिती नसते. शुक्राणू शरीरात 3 ते 5 दिवस राहत असल्याने आणि स्त्रीबीज केवळ 24 तासांपर्यंतच राहत असल्यानं गर्भधारणेसाठी ओव्ह्युलेशनच्या आधीचा काळ सर्वांत उत्तम असतो. ओव्ह्युलेशन होण्याआधीपासून ते ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एक दिवसापर्यंतच्या काळात लैंगिक संबंध ठेवल्यास गर्भधारणेची शक्यता वाढते. त्यानंतरच्या दिवसांतही लैंगिक संबंध ठेवावेत. ओव्ह्युलेशनची प्रक्रिया कधी घडते हे जाणून घेतलं तर गर्भधारणेचा कालावधी निश्चित करायला मदत होऊ शकते. त्यासाठी काही नैसर्गिक व इतर पद्धती आहेत. शास्त्रानुसार ‘या’ तिथींना शारीरिक संबंध ठेवणं अशुभ; नात्यावर होतो वाईट परिणाम बेसल बॉडी टेंपरेचर मोजणं शरीराच्या तापमानावर लक्ष दिल्यानं ओव्ह्युलेशन कधी होतं हे समजायला मदत होते. त्यासाठी बाजारात बीबीटी (BBT) थर्मामीटर मिळतात. यात 10 पूर्णांकापर्यंत तापमान मोजता येतं. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर शरीराचं तापमान मोजावं. ओव्ह्युलेशनच्या काळात हे तापमान 0.4 अंशांनी वाढतं. साधारणपणे मागच्या 6 दिवसांमधलं हे सर्वांत जास्त तापमान असेल, तर तो कालावधी निश्चित करावा. गर्भाशयग्रीवेतल्या स्रावामध्ये बदल गर्भाशयाच्या खालच्या भागातून स्रवणाऱ्या स्रावात बदल होणं हा ओव्ह्युलेशनचा संकेत आहे. ओव्ह्युलेशनपूर्वी हा भाग कोरडा आणि चिकट असतो. ओव्ह्युलेशनचा काळ जवळ आला, की हा स्राव थोडा दाट होतो. ओव्ह्युलेशनच्या तोंडावर मात्र हा स्राव अंड्यातल्या पांढऱ्या भागाप्रमाणे पारदर्शी आणि निसरडा असतो. या स्रावातल्या बदलांवर लक्ष ठेवल्यानं मासिक पाळीचं चक्रही नेमकं जाणून घेता येतं. ओव्ह्युलेशनबाबतची किट्स ओव्ह्युलेशन कधी होतं, हे तपासणारी काही किट बाजारात मिळतात. यात ल्युटेनायझिंग हॉर्मोनचं प्रमाण तपासून त्यावरून ओव्ह्युलेशनचा कालावधी निश्चित केला जातो. या चाचणीत हे हॉर्मोन किंचितसं वाढल्याचं दिसतं, तेव्हा ओव्ह्युलेशन पुढच्या 12 ते 48 तासांमध्ये होईल, असा अंदाज बांधता येतो. तुमच्याही मुलांमधील रागाचं प्रमाण वाढतंय? काय आहेत यामागची कारणं? याशिवाय काही नैसर्गिक पारंपरिक पद्धतींनीही ओव्ह्युलेशनचा कालावधी ओळखता येऊ शकतो. प्रत्येक महिलेमध्ये ही लक्षणं वेगळी असू शकतात. काही महिलांना सौम्य रक्तस्राव होतो, ओटीपोटात पेटके येणं, स्तन कोमल होणं, पोट फुगणं अशी वेगवेगळं लक्षणं दिसतात. गर्भधारणेमध्ये समस्या येत असतील, तर वैद्यकीय सल्ला नेहमीच उपयोगी ठरतो. वंध्यत्वाची लक्षणं जाणवत असतील, तरीही वैद्यकीय सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.