मुंबई, 8 ऑक्टोबर- अनेक मुलांमध्ये राग, तणाव आणि चिडचिड यांसारख्या समस्या खूपच वाढू लागल्या आहेत. पूर्वी या समस्या किशोरवयीन मुलांमध्ये जास्त दिसत होत्या. परंतु आता लहान मुलांनाही या समस्यांना सामोरं जावं लागतं. तुम्हाला माहिती आहे का, की मुलांमध्ये चिंता आणि तणावाची कारणं शाळेतलं वातावरण, कुटुंबातलं बदललेलं वातावरण, मित्रांसोबतचे मतभेद अशी बाह्यसुद्धा असू शकतात. तसंच काही वेळा मुलांमधल्या तणावाचं कारण त्यांच्यामध्ये असणारं ‘इंटर्नल फीलिंग’ आणि मानसिक ताणही असू शकतं. मुलं तणावग्रस्त असल्यास त्यांना जास्त राग येतो, असंही अनेकदा दिसून आलंय. मुलांवर तणावाचा मानसिक आणि शारीरिक परिणामही होतो. मुलांमधल्या या वाढत्या तणावाची कारणं कोणती असू शकतात, ते आपण जाणून घेऊ या. शैक्षणिक ताण शैक्षणिक ताण हे मुलांमधला तणाव आणि चिंतेचं मुख्य कारण असू शकतं. ‘व्हेरीवेलफॅमिली’च्या माहितीनुसार, अनेक मुलं शाळेत चांगली शैक्षणिक कामगिरी करण्याबद्दल चिंता करू लागतात. ज्या मुलांमध्ये चुका होण्याची भीती असते किंवा ज्यांना वर्गात नेहमी पुढं राहायचं असतं, अशा मुलांमध्ये शैक्षणिक ताण अधिक असतो. कुटुंबात मोठे बदल घटस्फोट, कुटुंबातल्या कोणाचा तरी मृत्यू, असुरक्षिततेची भावना किंवा घरामध्ये नवीन बाळाचा जन्म यांसारखे कुटुंबातले मोठे बदल मुलांमध्ये तणाव निर्माण करू शकतात. अनेक वेळा मुलं कुटुंबातले हे बदल अंगीकारू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना ताण येऊ लागतो. **(हे वाचा:** पालकांनो मुलांना दूध-बिस्कीट देत असाल तर सावधान! Milk Biscuit Syndrome चा धोका ) बुलिंग अनेक मुलं शाळेत बुलिंगला (गुंडगिरी) बळी पडतात. यामुळे मुलांवर मानसिक आणि शारीरिक परिणाम होऊ शकतो. ज्या मुलांना त्रास दिला जातो, ती लाजेपोटी त्यांच्या पालकांपासून अशा गोष्टी लपवतात. परंतु या काळात मुलांमधल्या तणावाची पातळी खूप वाढते. व्यग्र दैनंदिन वेळापत्रक जेव्हा मुलांवर अभ्यास, शिकवणी आणि शाळेचं दडपण असतं, तेव्हा त्यांचं दैनंदिन वेळापत्रक खूप व्यग्र होतं. अशा परिस्थितीत मुलांना स्वतःसाठी वेळ नसतो. व्यग्र वेळापत्रकामुळेही काही वेळा मुलांवर ताण येऊ शकतो. **(हे वाचा:** जगभरातल्या काही विचित्र शाळांमधले नियम माहिती आहेत का? ) भीतिदायक चित्रपट पाहणं, पुस्तक वाचणं काल्पनिक, भीतिदायक चित्रपट पाहणं किंवा त्या प्रकारातल्या पुस्तकांचं वाचन करणं हेदेखील मुलांमध्ये चिंता निर्माण करू शकतं. मुलं सहसा चित्रपटातलं भीतिदायक, हिंसक किंवा त्रासदायक दृश्यं, तसंच पुस्तकातली तशी माहिती यांच्यामुळे प्रभावित होतात. ही दृश्य मुलांच्या मनात घर करतात. त्यामुळे तणाव वाढू शकतो.मुलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांच्यामधल्या वाढत्या तणावाची कारण वेळीच शोधणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची मदत घेणंही फायद्याचं ठरतं. कारण या वाढत्या तणावामुळेच राग आणि चिडचिड वाढते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.