मुंबई, 28 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) संकटाला आता वर्षभर होईल. या काळात अनेक कंपन्यांनी लस (corona vaccine) तयार करण्यासाठी प्रयत्न केले असून काही कंपन्यांना यामध्ये यशदेखील आलं आहे. तीन लशींचे क्लिनिकल ट्रायलमध्ये (clinical trail) सुरुवातीचे परिणाम सकारात्मक दिसून आले आहेत. या लशी प्रभावी असल्याचं समोर आलं आहे. मात्र तरी या लशींचे काही साईड इफेक्ट (side effect) देखील आहेत आणि याबाबतही तज्ज्ञांनी सावध केलं आहे.
चाचण्यांमध्ये लशीचे साईड इफेक्ट होणं साहजिक आहे. काही साईड इफेक्ट विचित्र असतात ज्यामुळे भीती वाटते. तरी घाबरण्याची गरज नसल्याचं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. कारण ज्या लशीचे मोठ्या प्रमाणात साईड इफेक्ट आहेत त्या लशींना परवानगी देण्यात येणार नाही, असं तज्ज्ञ म्हणाले.
बहुतेक लशीच्या चाचणीवेळी अनेकांना ताप आणि डोकेदुखीचा त्रास जाणवला होता. रिपोर्टनुसार मॉडर्ना लशीचा डोस घेतल्यानंतर एका व्यक्तीला 102 डिग्रीपर्यंत ताप आला होता. तसंच मोठ्या प्रमाणात थंडी वाजली होती. मात्र काही तासांनंतर त्यांचा ताप उतरला होता. लस घेतल्यानंतर ताप येणं हे सामान्य असल्याचं तज्ज्ञ म्हणाले. काही जणांना तीव्र डोकेदुखी देखील जाणवली होती. तर काही जणांनी पोटदुखीची तक्रार केली होती. याचा अर्थ यामुळे पचन प्रक्रियादेखील प्रभावित होऊ शकते.
हे वाचा - Corona लसीकरणाची तयारी करताय, पण साइड इफेक्ट्सचं काय?
फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफोर्ड-अस्ट्राझेनेका लशींच्या चाचण्यांमध्ये वेदना होत असल्याचं समोर आलं आहे. पेशींमध्ये वेदना, सूज, डोकेदुखी, मायग्रेन अशा समस्या उद्भवल्याच्ं समोर आलं आहे. देखील शंका आहे. एका महिलेला हा त्रास जाणवला होता. पण त्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. शरीरावर ज्या ठिकाणी लस दिली जाणार आहे त्या जागेवर दुखण्याची शक्यता आहे. इम्युन रिस्पॉन्समुळे लस दिलेली जागा लाल होण्याची आणि रॅशेस पडण्याचीदेखील शक्यता आहे.
हे वाचा - कोरोना लशीसाठी पंतप्रधान मोदींची धडपड; स्वत:च करणार सुरक्षिततेची खात्री
हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या संदर्भात 18 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने राज्य सरकारांना एक पत्र पाठवलं आहे. त्यात कोविड 19 ची लस सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची दक्षता घ्यावी. लस दिल्यानंतर आरोग्यावर त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे लशीकरणातील सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी सध्याची अडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन (AEFI) ची दक्षता यंत्रणा अधिक मजबूत करावी, अशी सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. अडव्हर्स इव्हेंट्स फॉलोइंग इम्युनायझेशन (AEFI) ची दक्षता यंत्रणा मजबूत करण्यासाठी काही आवश्यक बाबीही सुचवण्यात आल्या आहेत. जेणेकरून लसीकरणाच्या काळात दुष्परिणामाबाबत तातडीने आणि सखोल माहिती केंद्राला देणे शक्य होईल, असे आरोग्य मंत्रालयानं या पत्रात म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus