प्रत्येकाचं लक्ष आता कोरोना लशीकडे लागून आहे. पुढील वर्षात कोरोना लस मिळण्याची आशा आहे. त्या दिशेनं मोदी सरकारनंदेखील हालचाली सुरू केल्या आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लशीच्या सुरक्षिततेची खात्री करणार आहेत. यासाठी देशात जिथं या कोरोना लशी तयार केल्या आहेत तिथं भेट देणार आहेत.
सर्वाधिक आशा आहेत त्या ऑक्सफर्ड, अॅस्ट्रेझेनका आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या लशीकडून. त्यामुळे मोदी येत्या शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सीरम इनस्टीट्युटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे.
असा अंदाज वर्तवला जात आहे की, देशातील एका नागरिकाला कोरोना लस देण्यासाठी 6 ते 7 डॉलर अर्थात जवळपा 500 रुपयांएवढा खर्च येईल. यामुळेच 130 कोटी लोकांना कोरोना लस देण्यासाठी सरकारने 500 अब्ज रुपयांचे बजेट निश्चित केले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी या अर्थसंकल्पाची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर लस देताना निधीची कमतरता भासणार नाही.