मुंबई, 12 ऑगस्ट- हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक पूजेला आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिना हा शंकराला अतिशय प्रिय असतो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते. तसंच, या महिन्यातील चतुर्थीला गणपतीचीही (Ganesh Chaturthi) पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार दर महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणपतीबाप्पाचं पूजन केलं जातं. या दिवशी उपास करून तो रात्री सोडला जातो. असं व्रत करणारे अनेक भाविक असतात. आज अशीच विनायकी चतुर्थी (Vinayak Chaturthi) आहे. या दिवशी गणपतीची विशेष पूजा करतात. गणपतीचं दुसरं नाव विघ्नहर्ता आहे. आपल्या सर्व दुःखांना दूर करण्यासाठी गणपतीची (Ganesh Pooja) पूजा करतात. तसेच, आज केलेल्या व्रतामुळे धनलाभही होतो. पाहूयात काय आहे विनायकी चतुर्थीची (Vinayak Chaturthi 2021) कथा. एक दिवस भगवान शिव (Lord Shiva) आणि माता पार्वती (Mata Parvati) नदी किनारी बसले होते. यावेळी वेळ घालवण्यासाठी म्हणून पार्वतीने शंकराला सारीपाट खेळूया असं म्हटलं. पण या खेळात कोण जिंकलं हे कसं ठरवणार? त्यामुळे मग शंकराने वाळलेल्या गवतापासून एक पुतळा बनवून त्याची प्राणप्रतिष्ठा केली. त्यामुळे या पुतळ्यात जीव आला. त्यातून तयार झालेल्या मुलाला मग शंकराने सांगितले, की आम्ही सारीपाट खेळणार आहोत तेव्हा यामध्ये कोण जिंकलं आणि कोण हरलं हे तू सांगायचं. (हे वाचा: Nag Panchami 2021: उद्या नागपंचमी; जाणून घ्या पुजेसाठीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व ) यानंतर त्या दोघांमध्ये सारीपाटाचे तीन डाव खेळले गेले. योगायोगाने तीनही वेळा माता पार्वतीच जिंकल्या. तीन डाव झाल्यानंतर त्यांनी या मुलाला विचारले, की कोण जिंकले. त्यावर या पुतळ्याने महादेव शंकर जिंकल्याचे जाहीर केले. त्यामुळे क्रोधित झालेल्या पार्वतीने या मुलाला लंगडा होण्याचा आणि चिखलात पडून राहण्याचा शाप दिला. मात्र, आपल्याकडून चुकून असं झाल्याचं म्हणत या मुलाने माता पार्वतीची माफी मागितली. यानंतर मग पार्वतीचा राग शांत झाला. पार्वती मातेने या मुलाला सांगितले, की या ठिकाणी गणेश पूजन करण्यासाठी काही नागकन्या येतील. त्यांच्या सांगण्यानुसार तू गणेश व्रत कर. असं केल्यानंतर मी तुझ्यावर प्रसन्न होईन. यानंतर पार्वती आणि शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. एका वर्षानंतर त्या ठिकाणी नागकन्या आल्या. तेव्हा या मुलाने नागकन्यांकडून गणेश व्रताची माहिती करुन घेतली. पुढे 21 दिवस सलग या मुलाने गणेश व्रत केलं. यामुळे गणपती प्रसन्न झाले, आणि त्यांनी या मुलाला वर मागण्यास सांगितलं. तेव्हा तो गणपती बाप्पांना म्हणाला, की मला एवढी शक्ती द्या, की मी माझ्या आईवडिलांनो सोबत घेऊन माझ्या पायांनी चालत कैलास पर्वतावर जाऊ शकेन. गणपतीने त्याला मागितलेला वर दिला. यानंतर हा मुलगा चालत कैलास पर्वतावर गेला, आणि शंकराला त्याने आपली कथा सांगितली. (हे वाचा: World Elephant Day : हत्ती दिन का साजरा होतो? तुम्हीही करू शकता हत्तींचं संरक्षण ) सारीपाट खेळलेल्या दिवसापासून पार्वती माता प्रभू शंकरावर रागावल्या होत्या. त्यामुळे या मुलाच्या सांगण्याप्रमाणे भगवान शंकरांनीही गणेश व्रत केले. यामुळे पार्वती मातेचा शंकरावरील राग शमला. त्यानंतर या व्रताचा विधी शंकरांनी माता पार्वतीलाही सांगितला. त्यानंतर पार्वती मातेला आपला मुलगा कार्तिकेयाला भेटण्याची इच्छा झाली. मग त्यांनीही 21 दिवस गणेश व्रत केलं, ज्यानंतर कार्तिकेयने स्वतःच येत पार्वती मातेची भेट घेतली. या दिवसापासूनच गणेश चतुर्थीचे हे व्रत सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारे व्रत म्हणून ओळखले जाते. आपणही सश्रद्ध असाल आणि मनोभावे हे व्रत केलं तर आपल्यालाही अनुभव येईल असं हिंदू पुराणांत सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.