मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

एखादा पाळीव प्राणी कारला धडकून अपघात झाल्यास चालकावर कारवाई होते का?

एखादा पाळीव प्राणी कारला धडकून अपघात झाल्यास चालकावर कारवाई होते का?

प्राण्यांचा  कार अपघात

प्राण्यांचा कार अपघात

अनेकदा पाळीव कुत्र्याचे पद्धतीनं अपघात होतात.अशावेळी चालकावर कारवाई होते का? जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 ऑक्टोबर :   रस्त्यावर प्रवास करताना काही वेळा एखादं जनावर किंवा पाळीव प्राणी गाडीला धडकल्याने अपघात होतात. तसंच बऱ्याचदा पाळीव कुत्र्याचा अपघात होतो. अशा अपघातामध्ये जनावरं किंवा पाळीव प्राणी गंभीर जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात. अशा वेळी कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता असते; पण अशा प्रकारची कारवाई कोणत्या नियमांनुसार होते, पाळीव कुत्र्याचा कार अपघात झाला तर त्यासंबंधी काय नियम आहेत, याविषयी सर्वांना फारशी माहिती नसते. अनेकदा अशा घटना न्यायालयापर्यंत पोहोचतात. त्यामुळे या संदर्भात नियम, कायदे काय सांगतात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

काही वेळा रस्त्यावर कारने प्रवास करत असताना अचानक एखादं जनावर गाडीला धडकतं किंवा गाडीखाली येतं. अनेकदा पाळीव कुत्र्याचे या पद्धतीनं अपघात होतात. अशा प्रसंगाचा तुम्हीदेखील कदाचित सामना केला असेल. अनेकदा अशी प्रकरणं न्यायालयापर्यंत जातात. बेंगळुरूमध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती. पाळीव कुत्र्याचा अपघात झाल्यानंतर कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी चालकावर लावलेलं कलम हटवलं. या प्रकरणात उच्च न्यायालयाने सांगितलं, 'पाळीव प्राण्याला कारची धडक बसणं हा रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा मानला जात नाही आणि यावर आयपीसी कलम 279 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीचा असा अपघात झाला तर हे कलम लावलं जाऊ शकते. याचाच अर्थ एखाद्या माणसाचा अपघात झाल्यास रॅश ड्रायव्हिंगसाठी आयपीसी 279 कलम लावलं जाऊ शकतं'.

हेही वाचा - अरे बापरे! या गावात नवरीला ढसाढसा रडणं कम्पलर्सरी; नाहीतर मिळते 'ही' भयंकर शिक्षा

पाळीव कुत्र्याचं अपघात प्रकरण पूर्णपणे भिन्न असू शकतं. गेल्या वर्षी महाराष्ट्रात अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एका कुत्र्याच्या मृत्यूची भरपाई त्याच्या मालकाला देण्यात आली. चंद्रपूर मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने कुत्र्याच्या मालकाला एक लाख 62 हजार रुपये आणि व्याजाची रक्कम देण्याचे आदेश विमा कंपनीला दिले. रस्ते अपघातात मरण पावलेल्या कुत्र्याच्या मालकाला पैसे मिळाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जातं.

आता कलम 279 विषयी बोलायचं झालं तर भारतीय दंड संहितेचं हे कलम रस्ते अपघातांवर आधारित आहे. यानुसार, चालक सार्वजनिक रस्त्यावर वेगानं, बेपर्वाईनं किंवा घाईनं वाहन चालवत असेल आणि त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येण्याची किंवा एखाद्या व्यक्तीला इजा होण्याची शक्यता असेल तर तो रॅश ड्रायव्हिंगसाठी दोषी असेल. या कलमांतर्गत दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला सहा महिने कारावास आणि 1000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो; मात्र हे केवळ माणसाला अपघात झाल्यासच शक्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. एखाद्या जनावराची टक्कर झाली तर या परिस्थितीत हे कलम लावता येणार नाही; मात्र याशिवाय प्रत्येक अपघातात वेगळी परिस्थिती असू शकते आणि यामध्ये घटनेचा हेतू पाहिला जातो.

एखाद्या जनावराला जाणूनबुजून मारण्यात आले असेल तर न्यायालय त्यावर वेगळ्या पद्धतीने कारवाई करू शकतं, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.

First published:

Tags: Car, Dog, Law