मुंबई, 29 ऑक्टोबर : लग्नातला सर्वांत भावनिक क्षण असतो तो म्हणजे नवरीची पाठवणी. नवरी माहेर सोडून सासरी जात असते. तिच्या माहेरच्या मंडळींचा निरोप घेत असते. त्या वेळी सर्वांच्या अश्रूंचा बांध फुटतो. नवरी तिच्या मायेच्या माणसांना मिठी मारून ढसाढसा रडते. भारतात हे दृश्य सर्रास पाहण्यास मिळतं; पण तुम्हाला माहिती आहे का, भारताप्रमाणे चीनमध्येही ही परंपरा एका ठिकाणी आहे; मात्र ती आपल्यापेक्षा जास्त विचित्र आहे. कारण तिथे लग्नाच्या वेळी नवरी रडली नाही, तर तिला मारहाण करून रडण्यास भाग पाडलं जातं. चीनमधल्या तुझिया जमातीची माणसं हजारो वर्षांपासून चीनच्या नैर्ऋत्येकडच्या सिचुआन प्रांतामध्ये राहतात. तिथे एक विचित्र परंपरा पाळली जाते, ती म्हणजे नवरीला लग्नात रडणं आवश्यक असतं. ऑडिटी सेंट्रल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही परंपरा 17व्या शतकापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि 1911 मध्ये क्विंग साम्राज्यापर्यंत ती चालू होती; मात्र कालांतराने ही प्रथा लोप पावत चालली आहे. इतिहास तज्ज्ञांच्या मते, ही परंपरा ज्या वेळी झाओ राज्याच्या राजकन्येचं यान राज्यात लग्न झालं, तेव्हा म्हणजेच साधारपणे इसवी सनपूर्व 475 ते 221 दरम्यान सुरू झाली असावी. तेव्हा नववधूच्या म्हणजेच राजकन्येच्या आईनं मुलीला रडतरडत निरोप दिला व तिला लवकर घरी येण्यास सांगितलं. लग्नसमारंभात रडण्याची ही पहिलीच वेळ मानली जाते. हेही वाचा - Viral Video : तरुणीने नशेत बाल्कनीतून मारली उडी अन्… पुढे जे घडलं ते धक्कादायक नवरी रडली नाही तर… तुझिया जमातीत लग्न झाल्यानंतर नवरी रडली नाही, तर ती गावात चेष्टेचा विषय बनते. परिसरातल्या व्यक्ती त्या वधूला तिच्या कुटुंबातली सर्वांत वाईट व्यक्ती मानतात. बऱ्याचदा नवरीला लग्नानंतर रडू आलं नाही, तर ती जोपर्यंत रडत नाही, तोपर्यंत तिची आई तिला मारते. विशेष म्हणजे पश्चिम प्रांतात ही प्रथा काहीशी वेगळी आहे. तिथे त्याला ‘जुओ टांग’ म्हणजेच हॉलमध्ये बसणं असं म्हटलं जातं. लग्नाच्या एक महिना आधी, दररोज रात्री वधू एका मोठ्या हॉलमध्ये जाते आणि तिथे बसून सुमारे एक तास रडते. 10 दिवसांनी तिची आईही तिच्यासोबत हॉलमध्ये बसून रडते. त्यानंतर पुन्हा 10 दिवसांनी वधूची आजी, बहीण, काकू, मावशी असे सगळे हॉलमध्ये एकत्र येऊन रडतात. या सर्व महिला रडत असताना हॉलमध्ये एक खास गाणं सुरू असतं. त्या गाण्याला ‘क्रायिंग मॅरेज साँग’ असं म्हणतात.
नववधूंसोबत इतर महिला रडतात, कारण… ऑडिटी सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, पूर्वीच्या काळी नववधू तिचं लग्न ठरवणाऱ्या व्यक्तींबद्दल रडताना अपशब्दही बोलत होती. या सर्व गोष्टींमागचं कारण असं सांगितलं जातं, की पूर्वीच्या काळी स्त्रियांना स्वतःचा पती निवडण्याची मुभा नव्हती. स्वत:च्या लग्नाच्या बाबतीत त्या काही बोलू शकत नव्हत्या. त्यामुळे लग्न झाल्यावर रडण्याची वेळ येऊ नये, म्हणून नववधू आधीच रडायची. तिच्याच कुटुंबातल्या इतर महिलांना रडताना पाहून तिला थोडाफार आधार मिळायचा. तिला वाटायचं, की इतर महिलांच्या बाबतीतही असंच घडलं आहे. यातून ती शांत मनानं नव्या आयुष्याची सुरुवात करत होती.