लंडन, 29 जानेवारी : एकीकडे पाकिस्तानमध्ये आर्थिक दिवाळखोरीमुळे वीज बंद करण्याची वेळ आलेली असताना, ब्रिटनच्या नॅशनल ग्रिडने वीजबचतीसाठी एक अनोखी योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत दिवसातला एक तास जरी ग्राहक विजेशिवाय राहू शकले, तर त्यांना पैशाच्या स्वरूपात मोबदला देण्यात येईल. नागरिकांना विजेचं महत्त्व पटवून देण्यासाठी व त्याचा वापर मर्यादित करण्यासाठी ब्रिटनमध्ये ही योजना तयार करण्यात आली आहे.
पाणी, इंधन, वीज या गोष्टींचा अमर्याद वापर रोखण्यासाठी सर्वच देशांनी योजना आखायला सुरुवात केलीय. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या लोकसंख्येसाठी पुरेल इतकं पाणी, इंधन भविष्यात उपलब्ध होईल का याबाबत संशोधक साशंक आहेत. त्यामुळेच आहे तो साठा मर्यादित स्वरूपात आतापासून वापरला तर आपल्या पुढच्या पिढ्यांना सुखानं जगता येऊ शकेल. त्यासाठी अशा योजना आखाव्या लागतात. 'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, या योजनेमध्ये सहभाग घेणाऱ्या ग्राहकानं एक तास वीज बंद ठेवली, तर त्या बदल्यात त्या ग्राहकाला हजारो रुपये मिळू शकतात. डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिसच्या अंतर्गत ग्राहकांना ही सवलत दिली जाते आहे. ब्रिटनमध्ये राहणं सध्या खूप महाग झालंय. तिथेही महागाई वाढली असल्याने नॅशनल ग्रिड कंपनीने डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिसचा लाइव्ह इव्हेंट चालू केलाय.
हे वाचा - दगडाच्या घर्षणातून होतेय वीजनिर्मिती, नागरिकांनी केला दावा; VIDEO VIRAL
देशातल्या नागरिकांना विजेचा वापर कमी करण्यासाठी प्रोत्साहन देणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं कंपनीनं म्हटलंय. या योजनेत सहभागी होणाऱ्यांना बचत करण्याचा फायदाही मिळणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ विजेच्या सर्वाधिक वापराच्या काळात निश्चित वेळासाठी वीज बंद ठेवावी लागणार आहे. तसं केल्याने मोठ्या प्रमाणावर विजेची बचत होईल व ग्राहकांना काही पैशांच्या स्वरूपात मोबदलाही मिळेल. नॅशनल ग्रिड ईएसओच्या वेबसाइटवर त्याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'तुम्ही डीएफएसच्या योजनेत भाग घेतला असेल, तर तुमचा वीज विक्रेता डेमॉन्स्ट्रेशन टेस्ट किंवा लाइव्ह इव्हेंटच्या आधी तुमच्याशी संपर्क साधेल. तो तुम्हाला त्या दिवशीच्या प्रत्यक्ष सहभागाबद्दल विचारणा करील,' असं त्यात म्हटलंय. ‘यंदाच्या हिवाळ्यात आम्हाला डिमांड फ्लेक्झिबिलिटी सर्व्हिस योजना वापरण्याची परवानगी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे,’ असं ईएसओच्या कार्यकारी संचालकांनी म्हटल्याचं वृत्त आज तकने दिलं आहे.
हे वाचा - Viral : 83 वर्षांपूर्वी किती यायचं वीज बिल? ही स्लिप पाहून चक्रावाल!
नागरिकांमध्ये विजेच्या मर्यादित वापराबाबत जनजागृती व्हावी, देशातला विजेचा वापर नियंत्रित व्हावा, यासाठी ब्रिटनमध्ये हा प्रयोग राबवण्यात येतोय. नागरिकांनी निश्चित काळासाठी वीज बंद ठेवली, तर त्याचा योग्य मोबदलाही त्यांना दिला जाणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Britain, Electricity, Lifestyle, Uk