नवी दिल्ली, 3 जुलै : केस गळणं (Hair Fall) ही आता सर्वसामान्य समस्या झाली आहे. हल्ली कमी वयातच केसांच्या समस्या (Hair Problem) व्हायला लागल्या आहेत. महिला आणि पुरुष सगळेच केस गळण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. आताच्या टेन्शनयुक्त लाइफस्टाईलमुळे (Lifestyle) केस गळण्याच्या समस्येचं प्रमाण वाढतंय. केसगळती थांबवण्यासाठी कितीही उपाय केले तरी ते तात्पुरते ठरतात. त्यामुळे केस गळती (Hair Loss) थांबली तरी पुन्हा व्हायला लागते. केसासाठी इतर उपचारांसह योगासनं आणि प्राणायम केल्याचा फायदा होतो. केसगळती थांबवण्यासाठी बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी सांगितलेले चार उपाय ज्यामध्ये योगासने आणि प्राणायमचा समावेश आहे, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या योगासनांबद्दल बाबा रामदेव यांनी इंडिया टीव्हीच्या एका कार्यक्रमात माहिती दिली होती. यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त अर्धा तास वेळ द्यावा लागणार आहे. वेळेशिवाय तुम्हाला यासाठी इतर कोणताही खर्च येणार नाही. 1. अनुलोम विलोम मांडी घालून जमिनीवर बसा. नंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या. त्यानंतर अनामिकेने डावी नाकपुडी दाबा आणि उजव्या नाकपुडीतून श्वास सोडा. ही संपूर्ण क्रिया डाव्या आणि उजव्या बाजू बदलत वारंवार करा. या संदर्भात नवभारत टाईम्सने वृत्त दिलंय. 2. कपालभाती वज्रासन किंवा पद्मासनाच्या मुद्रेत जमिनीवर बसा. हाताचं पहिलं बोट आणि अंगठा जोडून चित्त मुद्रा करा. नंतर तळहाताची बाजू वर ठेवून हात गुडघ्यावर ठेवा. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि झटक्यासह श्वास बाहेर सोडा. ही क्रिया वारंवार करा. कपालभाती करताना तोंडाने नव्हे तर नाकातून श्वास घ्या आणि सोडा. तुम्ही 20-30 प्राणायमांपासून सुरूवात करू शकता. नंतर शरीराला सवय झाली की संख्या वाढवू शकता. 3. शीर्षासन वज्रासनाच्या मुद्रेत योगा मॅटवर (Yoga Mat) बसा आणि हात पुढे नेत कोपरं जमिनीवर टेकवा. नंतर दोन्ही हातांची बोटं एकमेकांत घट्ट करत त्याच्यामध्ये डोक न्या आणि ते खाली टेकवा. नंतर पायाच्या बोटांच्या मदतीने शरीराचा खालचा भाग वर उचला, यामुळे शरीर त्रिकोणाच्या आकारात येईल. तुमचं कोपर जमिनीवर घट्ट ठेवा आणि हळूहळू पाय वर करा. दोन्ही पाय एकत्र उचलता येत नसतील तर त्यांना एक-एक करून वर उचलू शकता. काही वेळासाठी शीर्षासन करा त्यानंतर पाय हळूहळू खाली आणा. 4. सर्वांगासन पाठीवर झोपा आणि दोन्ही हात मांड्याजवळ ठेवा. नंतर हळूहळू पाय वर करा आणि ते 90 अंश कोनात आणा. मग हाताचं कोपर जमिनीवर ठेवून, कमरेला हाताने आधार द्या आणि हळूहळू पायांना डोक्याच्या दिशेने आणा. असं करत असताना पायांचे अंगठे जमिनीला मानेच्या मागे टेकवा. नंतर कंबरेवरून हात काढून जमिनीवर सरळ ठेवा. या मुद्रेत थोडा वेळ राहा आणि नंतर हळूहळू झोपलेल्या स्थितीत परत या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.