• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • यूकेनंतर आता द. आफ्रिकेतील कोरोनाचा स्ट्रेनही भारतात; किती घातक आहे हा नवा अवतार?

यूकेनंतर आता द. आफ्रिकेतील कोरोनाचा स्ट्रेनही भारतात; किती घातक आहे हा नवा अवतार?

दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची (south africa coronavirus strain) लागण झालेला 4 रुग्ण भारतात सापडले आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी :  कोणत्याही विषाणूचं म्युटेशन (Virus Mutation) ही एक सामान्य गोष्ट आहे. म्युटेशनदरम्यान विषाणूचे व्हेरियंट (Varient) दिसून येतात. सध्या यूके, ब्राझील आणि द. आफ्रिकेत कोरोनाचे नवे स्ट्रेन दिसून आले आहे आणि या स्ट्रेननं भारतातही शिरकाव केला आहे. यूकेतील कोरोनाचा स्ट्रेन हा अधिक संसर्गजन्य आहे, तसा दक्षिण अफ्रिकेतील स्ट्रेन (South Africa Strain) किती घातक आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. भारतात कोविड-19 च्या दक्षिण आफ्रिकन व्हेरिएंटच्या (प्रकार) चार केसेस आढळून आल्या आहेत. आयसीएमआरने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार म्युटेंट स्ट्रेनची लागण झालेले चारही जण जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगनंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. या रुग्णांमध्ये ताप, कफ, चव आणि वासाची संवेदना जाणं ही प्रमुख लक्षणे दिसून आली आहेत. स्ट्रेनच्या अनुषंगाने लक्षणांबाबत अभ्यास केला जात असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या म्युटेशनच्या या व्हेरिएंटबाबत डिसेंबरमध्ये माहिती देण्यात आली. यूके स्ट्रेनप्रमाणेच हा स्ट्रेन जास्त वेगाने पसरतो, असं सांगितलं जात आहे. दक्षिण आफ्रिकन स्ट्रेनचा संसर्ग प्रामुख्याने युवकांना अधिक प्रमाणात होत असल्याचं दिसून आलं आहे. ज्या युवकांना यापूर्वी कोणाताही आजार किंवा रोग झाला नव्हता, अशा युवकांना या स्ट्रेनचा संसर्ग होत असल्याचं दक्षिण अफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. पण हा व्हेरिएंट घातक आहे किंवा नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हे वाचा -  Shocking! लशीवर विश्वास नाही; कोरोनापासून वाचण्यासाठी ती चक्क स्वतःचीच लघवी प्यायली भारतात कोविशिल्ड (CoviShield) आणि कोवॅक्सिन (Covaccine) या कोरोना प्रतिबंधक लशी देणं सुरू झालं आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही आपली लस यूके व्हेरिएंटला प्रतिबंधक असल्याचा दावा केला आहे. पण दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटबाबत अद्याप संशोधन झालेलं नाही. ॲस्ट्राझेनका आणि ऑक्सफर्डच्या लशी या व्हेरिएंटवर मर्यादित स्वरुपात परिणामकारक ठरत असल्याचं दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने म्हटलं आहे. या त्याच लशी आहेत ज्या भारतात कोविशिल्ड नावाने दिल्या जात आहेत. भारतातूनच या लशी दक्षिण आफ्रिकेला पाठवण्यात आल्या होती. पण मर्यादित परिणाम बघता तिथं आता या लशींचा वापर थांबवण्यात आला आहे. त्याऐवजी एक डोस पुरेसा ठरणारी जॉन्सन अँड जॉन्सनची लस तिथं लसीकरणासाठी वापरण्यात येत आहे. ही लस दक्षिण आफ्रिकन कोरोना व्हेरिएंटला प्रतिबंधक म्हणून 57 टक्के सुरक्षित आहे. हे वाचा - ठरलं! सर्वसामान्यांसाठी या दिवशी बाजारात उपलब्ध होणार कोरोना लस भारतात आतापर्यंत या व्हेरिएंटच्या केवळ चार केसेस आढळून आल्याने चिंतेचे वातावरण नाही. यापूर्वी भारतात यूके व्हेरिएंटचा संसर्ग झाला असून, त्याचे रुग्ण सातत्याने आढळून येत आहेत. जर या दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटचा संसर्ग भारतामध्ये वाढला तर आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या लस त्यावर उपयुक्त ठरतील, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात अजूनही काही लशी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या ट्रायल्सचे निकाल बाकी आहेत. यापैकी कोणतीही लस (Vaccine) या व्हेरिएंटला प्रतिबंधक ठरू शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Published by:news18 desk
First published: