मुंबई, 07 मे : कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यात सध्या साबण महत्त्वाची भूमिका बजावत आहे. फक्त कोरोनाच नव्हे तर अशा अनेक आजारांपासून साबण आपलं संरक्षण करतो. साबणाच्या वापराने आपण अनेक आजारांना दूर ठेऊ शकतो. अशा या छोट्याशा साबणाचा शोध 4500 वर्षांपूर्वीच लागला आहे. पश्चिम आशियात साबणाचा इतिहास जवळपास 4500 वर्ष जुना आहे.
साबण सर्वात आधी नेमका कधी आणि कुठे तयार झाला याबाबत भरपूर संशोधन झालं मात्र ज्या व्यक्तीनं सर्वात आधी साबण तयार केला, तिची माहिती मिळालेली नाही.
टाइम मॅगजीनमध्ये प्रकाशित एका स्टोरीत साबण तयार करणाऱ्या महिलेला निनी नाव देण्यात आलं. कारण सुमेरियन संस्कृतीत औषधांची देवी निनीसिना आहे. मॅगझीननं साबण तयार करणारी पहिला महिलाच असावी असं मानलं आहे कारण सुमेरियन संस्कृतीच्या बाजारात ज्या साबणाचा सर्वात आधी निर्माण झाल्याचा उल्लेख केला जातो आहे, त्यावर महिलांची मक्तेदारी होती. सुमेरियन संस्कृतीचा विकास आजच्या दक्षिण इराकमध्ये झाला होता.
हे वाचा - कोरोनाव्हायरसविरोधातील लसीचं ह्युमन ट्रायल सुरू, आता परिणामांची प्रतीक्षा
Women in Ancient Mesopotamia पुस्तकाचे लेखक नेमेत निजात यांच्या मते, निनी एक पितृसत्ता समाजात वाढलेली होती. तज्ज्ञांच्या मते, निनी एका सामान्य कुटुंबात जन्मली त्यानंतर कपड्यांच्या बाजारात काम करू लागली. याच बाजारात पहिल्यांदा साबणाचा आविष्कार झाला असं मानलं जातं. केमिकल आर्कियोलॉजिस्ट मार्टिन लेवी यांच्या मते, जगात पहिल्यांदा साबण वापरण्याचा उल्लेख गिरसू शहरातच येतो, जो सुमेरियन संस्कृतीचा भाग होता.
याशिवाय इ.पू. 2800 मध्ये प्राचीन बेबीलोनमध्येही (इराकमधील एक प्राचीन शहर) साबणाचा उल्लेख आहे. बेबिलोनियाहून मिळालेल्या प्रमाणानुसार या साबणाच्या निर्मितीत पाणी, दालचिनीचं तेल आणि क्षार वापराल्याचा उल्लेख आहे. इजिप्तमध्ये एका पुरातन पुराव्यानुसार इ.पू. 1550 मध्ये साबणाचा पुरेशा प्रमाणात वापरही होऊ लागला. लोकं नियमित त्याचा वापर करू लागले. वनस्पती आणि प्राण्यांपासून काढण्यात आलेल्या तेलापासून हा साबण तयार केला जायचा.
हे वाचा - दुधाची तहान ताकावर...कोरोना लॉकडाऊनमुळे दारू मिळेना, मग लोकांनी काय केलं पाहा
यानंतर प्राचीन चीन, इस्राइल, अरब, रोम या ठिकाणाही साबणाचा वापर होऊ लागला. पंधराव्या शतकात साबण व्यापाराच्या रूपात विकसित झाला. 1525 साली फ्रान्सच्या मरसेलिसमध्ये साबणाचे 2 कारखाने होते. अठराव्या शतकानंतर तर साबण जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला. विसाव्या शतकात जगातल्या मोठ्या कंपन्यांनी स्वच्छतेला प्रोत्साहित करत आपल्या साबणाच्या व्यापाराचा विस्तारही केला.
आज हा साबण कित्येक लोकांना कोरोनाव्हायरसपासून सुरक्षा देत आहे. सामान्य नागरिकांसाठी साबण म्हणजे कोरोनाव्हायरसविरोधात एक प्रकारचं शस्त्रच झालं आहे.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.