नवी दिल्ली, 30 मे: कोरोनाच्या सुरुवातीपासून (Coronavirus Pandemic) ते आतापर्यंत मागील जवळपास दीड वर्षात इतके चढ-उतार आले की हा कोरोनाचा उद्रेक आणखी किती काळ टिकेल, हे सांगणं कठीण आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Second Wave Corona) ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे (Oxygen Crisis India) अनेकांना आपला जीव गमवावा लागला, यातच फुफ्फुसाचं आरोग्य (Healthy Lungs) योग्यरित्या टिकवून ठेवण्याची गरज नव्याने सांगितली गेली.
स्मोकिंगमुळे मृत्यूचा धोका 50 टक्के अधिक -
धुम्रपान अर्थात स्मोकिंग करुन आपल्या फुफ्फुसांना नुकसान पोहचवणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाची गंभीरता आणि यामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण 50 टक्के अधिक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एका रिपोर्टमध्ये सांगितलं. WHO चे प्रमुख टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी जारी केलेल्या एका प्रसिद्धीनुसार, धुम्रपान करणाऱ्यांना हा इशारा देण्यात आला आहे.
त्यामुळे कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी स्मोकिंग सोडणं, हेच फायद्याचं आहे. स्मोकिंगमुळे कॅन्सर, हृदयरोग आणि श्वासासंबंधी आजारांची जोखीमही वाढू शकते.
गुरुग्राम येथील नारायणा रुग्णालयातील कंसल्टेंट आणि सर्जन, हेड अँड नेक ऑन्कोलॉजी, डॉक्टर शिल्पी शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या काळात जे लोक स्मोकिंग करतात, त्यांनी कोरोना हे स्मोकिंग सोडण्यासाठी आणखी एक कारण असल्याचं पाहायला हवं. कोविडच्या तीव्रतेने ग्रस्त असलेल्या आणि फुफ्फुसांची क्षमता गमावत असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्यांना निरोगी फुफ्फुसाचं महत्त्व समजलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या फुफ्फुसांना या स्लो पॉईजनपासून वाचवण्यासाठी स्वत:शीच ठाम असायला हवं.
कोणतंही व्यसन सोडण्यासाठी सर्वात आधी स्वत:च्या मनाला तयार करणं, हीच पहिली पायरी असल्याचं, दिल्ली एम्समध्ये असिस्टेंट प्रोफेसर असलेल्या डॉक्टर सोनाक्षी यांनी सांगितलं. त्या वाईट व्यसनं सोडण्यास इच्छुक असलेल्यांसाठी काही उपाय सुचवतात. एका वेळी एकच सिगरेट खरेदी करा, एकाच वेळी संपूर्ण सिगरेट पिण्याऐवजी ती अर्धीच सोडून द्यायची सवय लावा. हळू-हळू सिगरेट सोडण्यासाठी एक तारीख निश्चित करा. आठवड्याच्या सुरुवातीला एक दिवस न पिण्याची सवय लावा, त्यानंतर एक दिवसाआड केल्यानंतर दोन-तीन दिवसांवर या, असा सल्ला सोनाक्षी यांनी स्मोकिंग सोडू इच्छिणाऱ्यांना दिला आहे.
दरम्यान, दिल्ली मधुमेह रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. ए.के. झिंगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मोकिंग करणाऱ्यांसाठी कोरोना व्हायरस अधिक धोकादायक, घातक ठरण्याचं मोठं कारण म्हणजे त्यांचं शरीर या विषाणूच्या हल्ल्याचा प्रतिकार करू शकत नाही आणि फुफ्फुसं कमजोर असल्याने त्यांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज इतरांहून अधिक असते. त्यामुळे कोरोना काळातही स्मोकिंग करत असाल, तर आजच्या World No Tobacco Day दिवशी सिगरेट, धुम्रपान सोडण्याचं निश्चित करा. कोणतीही गोष्ट एकाच फटक्यात होणं शक्य नाही, परंतु यासाठी केलेली सुरुवातचं तुमचं ध्येय गाठण्यास मदतशीर ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.