मुंबई, 19 ऑगस्ट : धूम्रपान (Smoking) हे आरोग्यासाठी हानिकारकच. पण हल्ली फक्त मोठी माणसंच नाही तर अगदी लहान मुलंही सिगारेट (Smoking in children) ओढताना दिसता. मुलांमध्ये पहिल्या टप्प्यात धूम्रपान मजा म्हणून केलं जातं, त्यानंतर त्याची सवय लागते आणि शेवटी ते व्यसन बनतं. मुलं धूम्रपानाकडे आकर्षित होण्यासाठी मित्रांकडून दबाव येणं किंवा त्यांच्या कृतीचं आकर्षण वाटणं यासारख्या बाबी कारणीभूत ठरतात. कारण याचा थेट संबंध परिपक्वता आणि स्वातंत्र्य तसंच जीवनात नव्या गोष्टी करण्याच्या मनोभूमिकेशी येतो.
आपल्या किशोरवयीन मुलांना (Teenagers) आयुष्यभर धूम्रपानाच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी या उपाययोजना उपयुक्त ठरु शकतात. जाणून घेऊया त्याविषयी.
संवाद साधणं आवश्यक
तुम्ही तुमच्या मुलांशी धूम्रपानाच्या व्यसनाबाबत खुलेपणानं आणि मैत्रीपूर्ण संवाद साधणं, चर्चा करणं (Discussion) आवश्यक आहे. धूम्रपानाविषयी त्यांना किती माहिती आहे, हे जाणून घ्या. तसंच धूम्रपान हे हानीकारक आहे, याची जाणीव त्यांना करून द्या. अशा विषयांवर बोलण्यात अडचण वाटत असल्याने काही पालक (Parents) आपल्या पाल्यांशी या विषयावर चर्चा करण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र धूम्रपानाविषयीचा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी पालकांनी पाल्यांशी मनमोकळी चर्चा करावी, असा सल्ला दिला जातो.
नाही म्हणणं महत्त्वाचं
जेव्हा मुलं किशोरवयात प्रवेश करतात तेव्हा त्यांच्यावर मित्रांचा दबाव आणि त्यांच्याशी निगडीत गोष्टींचं आकर्षण वाढताना दिसतं. अनेक मुलं याला बळीदेखील पडतात. अशावेळी पालकांनी आपल्या पाल्याला विश्वासात घेत, धूम्रपानाविषयी कुणी विचारलं असता त्यांना नकार देण्याविषयी प्रोत्साहित केलं पाहिजे. खरं तर पालक म्हणून तुम्ही त्यांच्यावर 'मी धूम्रपान करत नाही', असं म्हणणं बिंबवलं पाहिजे.
हे वाचा - नको ब्यूटी पार्लरमध्ये जाण्याचा त्रास; घरगुती उपायांनीच जातील चेहऱ्यावरचे डाग
आरोग्यावर होणारे दुष्परिणाम सांगा अनेक मुलांचा ई-सिगारेट (e-cigarettes), कॅंडी सिगारेट आणि हुक्का हे सुरक्षित असतं, असा समज असतो. परंतु त्यांना याउलट जागरूक केलं पाहिजे. धूम्रपान हे आरोग्यासाठी कसं हानीकारक आहे, हे पालकांनी पाल्यांना प्रत्यक्ष उदाहरणांचा संदर्भ देत समजावून सांगितलं पाहिजे. त्याचप्रमाणे पॅसिव्ह स्मोकिंगचे (Passive Smoking) हानीकारक परिणाम त्यांना समजावून सांगितले पाहिजेत. तसंच त्यांनी लोक धूम्रपान करत असलेल्या ठिकाणी जाणं का टाळावं, हेदेखील समजावून सांगावं.
पैशांचा हिशोब मांडा
दररोज सिगारेट किंवा ई-सिगारेटवर किती खर्च येतो, याचं गणित पालकांनी आपल्या पाल्यांसमोर मांडले पाहिजे. यावरून एका महिन्यात आणि एका वर्षात सिगारेट खरेदी करून ओढण्यावर किती खर्च होऊ शकतो, याची जाणीव पाल्यांना करून द्या. स्मार्टफोन, कपडे आदी वस्तूंवर होणारा खर्च आणि सिगारेटवर होणारा खर्च तसंच त्याचा फायदा आणि तोटा याची तुलनात्मक स्थिती पालकांनी पाल्यांसमोर मांडावी.
नेमकं आकर्षण समजून घ्या
पालकांनी मुलांना विश्वासात घेत जाहिरात एजन्सीज धूम्रपानाला कसं कूल, ग्लॅमरस आणि सेक्सी ठरवतात याचं स्पष्टीकरण द्यावं. या एजन्सींनी निर्माण केलेला हा आभास आहे, हे त्यांना समजावून सांगा. माध्यमांमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती धूम्रपान करताना दाखवली जाते किंवा ती त्याचे उदात्तीकरण करत असते, त्याचवेळी स्क्रिनवर धूम्रपान आरोग्यासाठी हानीकारक आहे, हा मथळा दिसतो, त्याकडे मुलांचं लक्ष वेधा.
आदर्श निर्माण करा
जर पालकच धूम्रपान करत असतील तर त्यांनी धूम्रपान करणं बंद करून आपल्या पाल्यासमोर आदर्श निर्माण करावा. तसंच धूम्रपानामुळे तुमच्यासमोर उभी असलेली आव्हानं तुमच्या पाल्याला समजवून सांगा. तसंच धूम्रपानाशी संबंधित कोणतीही वस्तू पाल्यांना सहज उपलब्ध होऊ नये, कुतुहलाने त्यांनी त्याचा वापर करू नये, यासाठी अशा वस्तू घरात ठेवू नका.
एक सिगारेट ठरू शकते हानिकारक
एका सिगारेटमुळेही धूम्रपानाचं व्यसन लागू शकते, हे पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगावं. मजा म्हणून केलेला धूम्रपानाचा प्रयत्न तुमची आयुष्यभराची गरज बनून जाऊ शकते. अनेक प्रौढ व्यक्तींना (Adult Person) धूम्रपानाचं व्यसन हे किशोरवयातच जडलं आणि नंतर हे व्यसन सोडणं त्यांच्यासाठी अशक्य बनलं हे देखील पाल्यांना सांगावे.
हे वाचा - अनवाणी चालण्याचे आहेत अनेक फायदे; डायबेटीस, BP सुद्धा राहील नियंत्रणात
जर पालक म्हणून तुम्ही आपल्या पाल्यांना सपोर्ट करत धूम्रपानाच्या दुष्परिणामांविषयी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधलात तर तुम्ही त्यांना या व्यसनापासून दूर ठेवू शकता आणि त्यांना निरोगी, आनंदी भविष्य देऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Parents and child, Smoking