मुंबई, 16 फेब्रुवारी : उभ्या हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती काहीच दिवसांवर आलीये. यंदाची शिवजयंती धडाक्यात कशी साजरी करायची याचा विचार तुम्ही केला असेलच. परंतु दरवर्षीप्रमाणे तुम्हाला एका गोष्टीची तयारी करावी लागणार आहे. तुमच्या घरातील लहान मुलाला शिवजयंतीनिमित्त भाषण लिहून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. कारण दरवर्षीच शिवजयंतीनिमित्त शालेय मुलांना भाषण करण्यास सांगितलं जातं. मग ही लहान मुलं भाषण कसं करायचं, हे विचारायसाठी तुमच्याकडे येतात. मग तुम्हालाच त्यांच्या भाषणाची तयारी करून घ्यावी लागते. तुम्ही त्यांची भाषणाची तयारी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हवी. लहान मुलांकडून भाषणाची तयारी (Shivjayanti speech for children) करून घेताना पुढील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.. शिवजयंतीच्या भाषणात करा ‘या’ मुद्द्यांचा समावेश –
- 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला.
- त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते.
- शहाजीराजे भोसले विजापूर दरबारात सरदार होते. लहानपणापासूनच जिजाबाईंनी त्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रुजवले.
- जिजामाता बाल शिवबाला प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या कथा सांगत. या कथांच्या माध्यमातून त्यांनी शिवबावर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे संस्कार केले.
- लहानग्या शिवबास तलवार चालविणे, दांडपट्टा खेळणे, भालाफेक, घोड्यावर रपेट यांसारखं लष्करी शिक्षणही दिलं.
- तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पासलकर यांसारखे कितीतरी जिवास जीव देणारे मावळे शिवरायांना मिळाले.
- 27 एप्रिल 1645 रोजी शिवरायांनी जिवलग मावळ्यांना सोबतीला घेऊन किल्ले रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली.
- 7 मार्च 1647 शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन तोरणा किल्ला जिंकला. तोरण्याच्या रूपानं पहिला किल्ला स्वराज्यात सामील केला.
- 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाचा वध करून स्वराज्याला मोठ्या संकटातून सोडवलं.
- 5 एपिल 1663रोजी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शायिस्तेखानाची लाल महालात घुसून बोटे छाटली.
- 1660 मध्ये सिद्धी जौहरच्या पन्हाळ्याला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप सुटले. त्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशीद यांसह अनेक जिगरबाज मावळ्यांनी बलिदान दिलं.
- औरंगजेबानं शिवरायांना आग्र्यामध्ये कैद केलं होतं. या कैदेतून शिवराय शिताफीनं निसटले आणि त्यानंतर तहात हरलेले किल्ले पुन्हा स्वराज्यात आणले.
- अवघं हिंदवी स्वराज्य ज्या घटनेची वाट पाहत होता तो दिवस उजाडला आणि 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला.
- 3 एप्रिल 1680 या दिवशी शिवरायांचं रायगडावर निधन झालं.
- रयतेच्या कल्याणासाठी मूठभर मावळ्यांना सोबतीला घेऊन आदिलशाही, निजामशाही, मोगल या जुलमी राजवटींविरूद्ध आयुष्यभर लढणारे छत्रपती शिवाजी महाराज तीनशे वर्षांनंतरही रयतेच्या मनात जिवंत आहेत.
शिवजयंती 2023 निमित्त भाषण लहान आणि सोपं ठेवा जेणेकरून मुलं गोंधळून जाणार नाहीत आणि त्यातील काही भाग विसरणार नाहीत. तसंच शिवाजी महाराजांवरील भाषण हे त्यांना सहज पाठ होईल. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्ही आणखी माहिती शोधू शकता. एकदा का भाषण तयार झालं की त्याचा काहीवेळा सराव मुलांकडून करून घ्या. असं केल्यानं मुलं दमदार भाषण करू शकतील. तसंच त्यांच्या मनातही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा.