मुंबई, 05 मार्च: गेल्या काही वर्षात हृदयविकार (Heart Disease) आणि हृदयविकाराच्या झटका अर्थात हार्ट अॅटॅकमुळे (Heart Attack death) मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. हृदयविकाराच्या झटक्यामुळे अकाली मृत्यू होण्याचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. जागतिक कीर्तीचा ऑस्ट्रेलियन लेग स्पिनर शेन वॉर्न (Shane Warne Death) याचं वयाच्या 52 व्या वर्षी हार्ट अॅटॅकमुळे निधन झालं. त्यामुळे या आजारावर सध्या चर्चा सुरू आहे. मात्र या अनुषंगाने एक खुलासा संशोधकांनी केला आहे. हृदयविकारामुळे दरवर्षी सर्वाधिक लोकांचा मृत्यू होतो. त्यात महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हार्ट अॅटॅकचा धोका अधिक आहे, असं संशोधकांनी म्हटलं आहे. धावपळीची जीवनशैली, वाढते ताण-तणाव, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि अनुवंशिकता आदी कारणांमुळे हृदयविकाराचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पूर्वी सर्वसाधारणपणे ज्येष्ठांमध्ये दिसून येणारा हा विकार आता कमी वयाच्या व्यक्तींमध्येही दिसू लागला आहे. दरवर्षी हृदयविकारामुळे सर्वाधिक मृत्यू होतात, असं यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन अर्थात सीडीसी (CDC) च्या अहवालात म्हटलं आहे. हे वाचा- या कारणामुळे झालं शेन वॉर्नचं निधन; जाणून घ्या लक्षणं आणि कारणं एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावर महिलांच्या तुलनेत पुरुषांना हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता जवळपास दुप्पट असते, असं 2016 मध्ये जामा इंटरनल मेडिसीन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नॉर्वेच्या ट्रोम्सो अभ्यासात म्हटलं आहे. तसंच महिलांच्या तुलनेत पुरुषांना हार्ट अॅटॅकचा धोका अधिक असतो, असा दावा अमेरिकन हार्ट असोसिएशनने (American Heart Association) केला आहे. याबाबत जॉन हॉपकिन्स सिकारॉन सेंटर फॉर द प्रीव्हेंशन ऑफ हार्ट डिसीजचे क्लिनिकल रिसर्च डायरेक्टर मायकल जोसेफ यांनी सांगितलं की, ‘पुरुषांना महिलांपेक्षा 10 वर्ष आधी हार्ट अॅटॅक येऊ शकतो.’ तज्ज्ञांच्या मते, ‘वयाच्या 45 व्या वर्षी पुरुषांमध्ये हार्ट अॅटॅक येण्याचा धोका वाढतो तर महिलांमध्ये ही शक्यता वयाच्या 55 वर्षानंतर निर्माण होते’. खरं तर, मेनोपॉजपूर्वी (Menopause) स्त्रिया एथेरोस्क्लेरोसिसपासून अधिक सुरक्षित असतात. जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक (Plaque) जमा होऊ लागतो, तेव्हा त्यास एथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात आणि यामुळे हार्ट अॅटॅकचा धोका वाढतो. हे वाचा- प्रसूतीनंतर मातांनी ही खबरदारी घ्यावी, अन्यथा टाक्यांमध्ये होऊ शकतो संसर्ग महिलांना वाचवतं इस्ट्रोजन क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, महिलांमध्ये मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन (Estrogen) हार्मोनची पातळी कमी होण्यास सुरुवात होते. मेनोपॉजपूर्वी इस्ट्रोजनची उच्च पातळी महिलांना हार्ट अॅटॅकपासून वाचवते. त्यामुळे महिला पुरुषांप्रमाणे 45 वर्षी हार्ट अॅटॅकला बळी पडत नाहीत. ट्रोम्सो अभ्यासातील इस्ट्रोजन थेअरीला पूरक असे पुरावे अद्याप हाती आलेले नाहीत. अमेरिकेत दरवर्षी सुमारे 7 लाख 35 हजार लोक हार्ट अॅटॅकमुळे मृत्युमुखी पडतात. त्यापैकी सुमारे सव्वा पाच लाख लोकांना प्रथमच हार्ट अॅटॅक आलेला असतो. याबाबतचं कारण शोधण्यासाठी संशोधकांनी सुमारे 34000 पुरुष आणि महिलांच्या आरोग्याचं निरीक्षण केलं. तसंच 1979 ते 2012 दरम्यान हार्ट अॅटॅकचा अनुभव घेतलेल्या सुमारे 2800 लोकांवर लक्ष ठेवण्यात आलं. कोलेस्टेरॉल पातळी, हाय ब्लड प्रेशर, डायबेटिस, हाय बॉडी मास इंडेक्स आणि फिजिकल अॅक्टिव्हिटी या गोष्टींचं बारकाईनं निरीक्षण करता, संशोधकांना दिसून आलं की हार्ट अॅटॅकसाठी जोखमीच्या ठरणाऱ्या या घटकांमध्ये कोणताही मोठा जेंडर गॅप दिसत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.