प्रश्न : पारंपरिक विचारसरणीच्या तुमच्या आई-वडिलांना जो मुलगा आवडतो, तो खरं तर तुमचा बॉयफ्रेंड आहे आणि तुम्ही गे (समलिंगी) आहात, तर ही गोष्ट आई-वडिलांना कशी सांगायची?
उत्तर : तुम्ही आई-वडिलांवर अवलंबून असाल तर आई-वडिलांना ही गोष्ट सांगण्याआधी या गोष्टीची निश्चिती करा की, तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनू शकता. अनेक पालक हळूहळू आपल्या पाल्यांची समलैंगिकता स्वीकारतात पण भारतीय कुटुंबांमध्ये समलैंगिकता ही सर्वसाधारण बाब बनण्यासाठी अजून बराच पल्ला गाठण्याची गरज आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे ही बाब आई-वडिलांना सांगण्यासाठी कोणताही सुरक्षित मार्ग नाही. तुम्ही कितीही गोड शब्दांत किंवा काही तरी क्लृप्ती करून ही गोष्ट त्यांना सांगितली तरीही त्यांना धक्का बसेल, यात काही शंकाच नाही. त्यामुळे त्यांना ही गोष्ट सांगितल्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांना सामोरं जाण्यासाठीची मानसिक तयारी तुम्हाला करण्याची गरज आहे. तुम्ही गे आहात हे तुम्ही स्वतः संपूर्णपणे स्वीकारलेलं आहे ना? त्यामुळे तुम्हाला लाज वाटत नाही ना? याची खात्री करा. आई-वडील तुमच्यावर वेगवेगळे आरोप करू शकतील, तुमच्यासमोर रडू शकतील, अशा विविध शक्यता आहेत. त्यामुळे 'माझ्यापुढे जे काही वाढून ठेवलेलं असेल, ते स्वीकारण्याची माझी क्षमता आहे का?', असा प्रश्न स्वतःला आधी विचारा. तुमचे पालक कदाचित तुमच्या त्या मित्राचा तिरस्कार करू लागतील आणि कदाचित त्यांच्या आयुष्यात पुन्हा स्थान देणार नाहीत.
हे वाचा - Sexual Wellness : 'समलिंगी मित्रासोबत राहिल्याने मीसुद्धा तसाच होईन का?'
अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर यात बऱ्याच नाट्यमय गोष्टी घडू शकतात. त्यामुळे या प्रसंगी तुमचे अगदी जवळचे मित्र तिथे उपस्थित असतील असं बघा, जेणेकरून ते तुम्हाला मानसिक आधार देऊ शकतील. तुमच्या पालकांनी आधी ही स्थिती नाकारल्यानंतर आणि त्यांच्या धक्क्याची तीव्रता ओसरल्यानंतर तुम्ही ही गोष्टी स्वीकारण्यासाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करू शकता. पण ही शक्यता लवकर उद्भवत नाही. या काळात घरात तणावपूर्ण वातावरण असू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता यांचा विचार करून ठेवला पाहिजे.
हे वाचा - मिठी मारणं ही लैंगिक प्रवृत्ती असते का?
ही गोष्ट एकदम आई-वडिलांना सांगण्यापेक्षा यापैकी कोणाला तरी एकाला किंवा भावंड असल्यास त्याला/तिला सांगण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. अर्थातच यापैकी कोण हा विषय समजून घेऊ शकेल, उदारमतवादी असेल, त्या व्यक्तीला तुम्ही आधी सांगण्याचा विचार करू शकता. तसं केल्यानंतर काही कालावधी गेल्यावर दुसऱ्या पालकाला आधी कल्पना द्यायला सांगून मग तुम्ही एकदम दोघांसमोर हा विषय मांडू शकता. म्हणजे त्यांना बसणाऱ्या धक्क्याची तीव्रता कमी असेल. परिस्थिती हाताळण्याचा हाच त्यातल्या त्यात सोपा मार्ग आहे, असं वाटतं. हे करण्याची शक्ती तुला मिळो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual wellness