आता ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस; Sputnik V च्या ट्रायलला मंजुरी

आता ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस; Sputnik V च्या ट्रायलला मंजुरी

ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीनंतर आता रशियन कोरोना लस (russian corona vaccine) Sputnik V देखील भारतात दिली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीनंतर (Corona Vaccine) आता भारतात रशियाचीही लस (russian coron vaccine) दिली जाणार आहे. Sputnik V लशीचं भारतात ट्रायल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज कंपनीला (Dr. Reddy’s Laboratory Ltd.) ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.

रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने Sputnik V ही लस तयार केली आहे. रशियामध्ये सध्या या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. भारतातही या लशीचं ट्रायल करण्यासाठी भारताच्या डॉ. रेड्डीज  कंपनीने रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडशी (RDIF-Russian Direct Investment Fund)  करार केला आहे.

भारतात या लशीचं ट्रायल करण्यासाठी डॉ. रेड्डीजने डीजीसीआयकडे अर्ज केला होता. डीजीसीयीआने सुरुवातीला परवानगी दिली नाही. त्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा अर्ज केला आणि आता या लशीच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे.  लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

डॉ. रेड्डी लेबोरेटरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि को-चेअरमन जीव्ही प्रसाद यांनी सांगितलं, "पूर्ण प्रक्रियेत DCGI च्या मार्गदर्शनांचा आम्ही स्वीकार करत आहोत. भारतात आम्हाला ट्रायल सुरू करायला परवानगी मिळाली ही खूप मोठी बाब आहे. महासाथीचा सामना करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत"

हे वाचा - आणखी एक देश कोरोना लशीसाठी सज्ज! नोव्हेंबरमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता

रशियाने स्पुतनिक V लस लाँच करत आपण जगातील सर्वात पहिली लस तयार केल्याचा दावा केला. एडिनोव्हायरस व्हेक्टरवर आधारित असलेली ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या मुलीलाही देण्यात आली आहे. सध्या 13,000 लोकांना ही लस दिली जाते आहे. या लशीला 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली आणि यानंतर पहिली कोरोना लस तयार करणारा रशिया जगातील पहिला देश बनला. मात्र तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच लशीला परवानगी दिल्याने या लशीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले आहेत.

रशियाच्या आणखी दोन लशी तयार

रशियाची दुसरी EpiVacCorona लस सिंथेटिक लस आहे. सायबेरियातील व्हेक्टर इन्स्टिट्युटने ही लस तयार केली आहे. ही लस Sputnik V पेक्षा सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. याचं ट्रायल 100 जणांवर करण्यात आलं आहे. रशियाचे उपराष्ट्राध्यक्ष तात्याना गोलिकोवा आणि चीफ सेनेटरी डॉक्टर अन्ना पोपोवा यांनी हे लस घेतली आहे, त्यांनी याच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिलेली नाही. पहिली लस या लशीला 14 ऑक्टोबरला मंजुरी दिली आहे. लशीचे 60,000 डोस लवकरच तयार केले जाणार आहे. 40,000 जणांवर पोस्ट रजिस्ट्रेशन क्लिनिकल ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

हे वाचा - तुमचा Blood group कोणता? रक्तगटावरून ओळखा तुम्हाला कोरोनाचा किती धोका

रशियाची तिसरी कोरोना लस चुमाकोव्ह सेंटर ऑफ रशियन अॅकडमी ऑफ सायन्सेजने तयार करण्यात आली आहे. या लशीचं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पहिला टप्पा 6 ऑक्टोबरला सुरू झाला. त्यावेळी 15 जणांना ही लस देण्यात आली आहे. यापैकी कुणामध्येही लशीचा दुष्परिणाम दिसलेला नाही, असं सांगितलं जातं आहे. या लशीचं दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यावेळी 285 जणांना लस दिली जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. क्लिनिकल ट्रायल डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या लशीला डिसेंबर 2020  पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Published by: Priya Lad
First published: October 17, 2020, 7:24 PM IST

ताज्या बातम्या