

रशियाने आपल्या दोन कोरोना लशींना मंजुरी दिली आहे. आपली तिसरी लसही तयार असल्याचा दावा रशियाने केला आहे. आता रशियानंतर आणखी एका देशाची कोरोना लस सज्ज झाली आहे. नोव्हेंबरमध्येच या लशीला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे.


अमेरिकेतील फायजर (pfizer) कंपनीने तयार केलेली ही लस. या लशीत जर्मन कंपनी BioNTechची भागीदारी आहे. लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केला जाणार आहे. या लशीची सध्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ज्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.


लशीची सुरक्षितता आणि प्रभाव समजल्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या लशीला मंजुरी मिळण्यासाठी अर्ज केला जाणार आहे. यूएस अन्न आणि औषध प्रशासनाकडे अर्ज केला जाणार असल्याचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.


फायजरची लस mRNA आधारीत लस आहे. लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीत अँटिबॉडी आणि टी-सेल निर्माण होत असल्याचं समोर आलं आहे.